वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
यजमान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील गेल्या रविवारी झालेल्या दुसऱया सामन्यात भारताने न्यूझीलंडवर निसटता विजय मिळवून बरोबरी साधली आहे. आता या मालिकेतील शेवटचा निर्णायक सामना अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर बुधवारी होत आहे. लखनौच्या सामन्यात खेळपट्टी बनवणाऱया क्युरेटरची हकालपट्टी करण्यात आली आहे.
लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमची दोन्ही संघांना धक्का देणारी ठरली. या स्टेडियमच्या खेळपट्टीचा स्वभाव अनपेक्षित असल्याचे मत कर्णधार हार्दिक पांडय़ाने व्यक्त केले होते. भारताने हा सामना केवळ एक चेंडू बाकी असताना जिंकला होता. या सामन्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना कर्णधार पंडय़ाने ही खेळपट्टी धक्कादायक असल्याचे म्हटले होते. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला 20 षटकात 8 बाद 99 धावा रोखले होते. त्यानंतर न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनाही धावा जमवणे कठीण गेले होते. भारताला विजयासाठी जरुरी असलेल्या 100 धावा जमवण्यासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत कसरत करावी लागली होती.
लखनौच्या स्टेडियममध्ये खेळपट्टी बनवणाऱया क्युरेटरची हकालपट्टी केल्यानंतर उत्तरप्रदेश क्रिकेट संघटनेने त्याच्या जागी संजीवकुमार अगरवाल या नव्या क्युरेटरची नियुक्ती केली आहे. अगरवाल हा अनुभवी क्युरेटर म्हणून ओळखला जातो. लखनौच्या या मैदानात यापूर्वी राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धामधील अनेक सामने खेळवले गेले होते. तसेच खराब हवामानाचा विपरीत परिणाम या खेळपट्टीवर झाल्याचे बोलले जाते. आता या स्टेडियममध्ये नवी खेळपट्टी बनवली जाणार असून या कामासाठी अधिक कालावधी लागणार असल्याचे उत्तरप्रदेश क्रिकेट संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले. क्युरेटर संजीवकुमार अगरवालने यापूर्वी बांगलादेशमध्ये काही खेळपट्टय़ा बनवल्या आहेत.