वडगाव येथील कृषी पत्तीन सोसायटीची इमारत खाली करण्याची सूचना : आयुक्तांच्या सूचनेबद्दल आश्चर्य
प्रतिनिधी /बेळगाव
वडगाव येथील कृषी पत्तीन सहकारी सोसायटीला इमारत खाली करा, असे महापालिकेचे आयुक्त रुदेश घाळी यांनी सांगितले. बुधवारी वडगाव येथे जाऊन सोसायटीच्या कर्मचाऱयांना आणि पदाधिकाऱयांना त्यांनी ही सूचना केली. या परिसरात 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी जलकुंभची उभारणी करण्यात येत आहे. तेव्हा तातडीने इमारत खाली करा, असे त्यांनी सांगितले. जलकुंभाला कोणतीही अडचण होणार नाही, असे असताना महापालिका आयुक्तांनी दिलेल्या सूचनेमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
या सोसायटीच्या इमारतीची लीज संपली आहे. ही बाब खरी असली तरी आम्हाला पर्यायी जागा उपलब्ध केल्याशिवाय आम्ही ही इमारत सोडू शकत नाही, असे सांगण्यात आले. शेतकऱयांसाठी ही सोसायटी आहे. शेतकऱयांना विनाव्याज कर्ज सोसायटीच्या माध्यमातून दिले
आहे. त्यामुळे पूर्वीपासूनच जुन्या इमारतीमध्ये या सोसायटीचे कामकाज सुरू आहे. आम्ही रितसर करदेखील भरला आहे, असे महापालिका आयुक्तांना सांगण्यात आले.
समाजाच्या हितासाठी सुरू असलेल्या सोसायटीवर दबावतंत्र
महापालिका आयुक्तांनी सोसायटीच्या कार्यालयात येवून ही इमारत महापालिकेची आहे, तुम्ही खाली करा, असे सांगितले. यामुळे शेतकऱयांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
शहरामध्ये तसेच उपनगरांमध्ये अनेक महापालिकेच्या इमारती आहेत. त्या ठिकाणी बेकादेशीररित्या अनेकांनी व्यवसाय थाटला आहे. त्या आस्थापनांवर कारवाई करणे गरजेचे असताना समाजाच्या हितासाठी सुरू असलेल्या सोसायटीवर दबावतंत्र वापरला जात आहे. महापालिका आयुक्तांच्या या प्रकाराबद्दल सोसायटीच्या संचालकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
सोसायटीच्या माध्यमातून सव्वाकोटींची कर्जे
कृषी पत्तीन सोसायटीच्या माध्यमातून वडगाव परिसरातील शेतकऱयांना सव्वा कोटींचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. या सोसायटीने मोठी प्रगती केली आहे. 25 लाख रुपयांची वैयक्तिक कर्जेदेखील दिली आहेत. अशाप्रकारे नाहक त्रास देणे ही बाब गंभीर आहे. तेंव्हा याचा महापालिकेच्या अधिकाऱयांनी विचार करावा, अशी मागणी होत आहे. पर्यायी जागा उपलब्ध केल्यास सोसायटी हलविण्यास संचालक मंडळ तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.