उपचार घेणाऱ्या दोघांना वॉर्डातून ओढून मारहाण, मारहाणीत 5 ते 6 जणांचे डोके फुटले, परिसरात रक्ताचा सडा, तीन जण गंभीर
सातारा / प्रतिनिधी
सातारा जिल्हा रुग्णालयात रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास गोसावी समाजातील दोन गटात दगड तसेच धारदार शस्त्रासह सशस्त्र राडा झाला. यावेळी जमावाने जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असलेल्या दोघांना वॉर्ड क्र. 27 मधून ओढून गंभीर मारहाण केली. तर दुसऱ्या बाजूनेही हल्ल्याचा प्रतिकार केला यामध्ये पाच ते सहा जणांचे डोके फुटले असून त्यातील एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उर्वरितांना उपचार करुन सोडण्यात आले आहे. तसेच सुमारे 15 ते 20 मिनिटे सुरू असलेल्या या धुमश्चक्रीमुळे जिल्हा रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण होते. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार रामनगर (ता.सातारा) येथे काळे आणि चव्हाण या दोन गोसावी समाजातील कुटुंबामध्ये रविवारी सायंकाळी 7 च्या सुमारास घरगुती वादावरुन भांडणे झाली होती. यामध्ये दिलीप पंडित काळे व अमोल काळे हे गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर वॉर्ड क्र. 27 मध्ये उपचार सुरू होते. दरम्यान, रात्री 8.30 वाजता रामनगर येथील काळे व चव्हाण या दोन्ही कुटुंबातील मोठा जमाव जिल्हा रुग्णालय परिसरात जमला.
यावेळी त्यांच्यात वादावादी पुन्हा सुरू झाली. तेंव्हा चव्हाण कुटुंबियांतील काही जण वॉर्ड क्र. 27 मध्ये घुसले व उपचार घेत असलेल्या दिलीप पंडित काळे व अमोल काळे यांना वॉर्डातून बाहेर ओढून आणले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयाच्या पोर्चमध्येच पुन्हा हल्ला चढवण्यात आला. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले. याचा प्रतिकार म्हणून काळे कुटुंबियांतील व्यक्तींनीही सशस्त्र हल्ला केला. यामध्ये दोन्ही बाजूकडील 5 ते 6 जणांची डोकी फुटली आहेत. यातील एकजण गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्यावर तसेच पहिल्या दोन जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाकी उर्वरित किरकोळ जखमींवर उपचार करुन सोडून देण्यात आले आहे. दरम्यान, रामनगर येथे झालेल्या मारामारीची नोंद तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरा दाखल झाली असून जिल्हा रुग्णालयात झालेल्या राडय़ाबाबतची नोंद रात्री उशिरापर्यंत नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.
जिल्हा रुग्णालय परिसरात तणाव
रात्री साडे आठच्या सुमारास रामनगर येथील काळे व चव्हाण या दोन गोसावी समाजातील कुटंबातील जवळपास 25 ते 30 जण एकत्र जमल्यानंतर एकच गोंधळ सुरू झाला. सुरुवातीला त्यांच्यामध्ये वादावादी झाली नंतर त्याचे पर्यावसन सशस्त्र राडय़ात झाल्यामुळे जिल्हा रुग्णालय परिसरात चांगलाच तणाव निर्माण झाला होता.
पोलीस छावणीचे स्वरुप
रात्री 8.30 वाजता सुरू झालेला राडा जवळपास 15 ते 20 मिनिटे सुरू होता. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांची फौज जिल्हा रुग्णालयात परिसरात दाखल करण्यात आली. त्यानंतर जमावाला पांगवण्यात आले. पण तरीसुद्धा हा जमाव परिसरात फिरत होता. त्यामुळे पुन्हा राडा होऊ नये म्हणून डीबीचे पथक तसेच बीट मार्शल असा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षकांनी दिली होती भेट
जिल्हा शल्य चिकित्सकांना झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेनंतर पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी शनिवारी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तेथील सुरक्षिततेची पाहणी केली होती. यावेळी कायमस्वरुपी येथील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱयाच दिवशी चक्क रुग्णालयात घुसन मारहाण करण्यात आल्यामुळे जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनासह पोलिस सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे काढण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.
डॉक्टर, परिचारिका व नातेवाईकांची पळापळ
संतप्त जमाव वॉर्ड क्र. 27 मध्ये घुसला व तेथून उपचार घेत असलेल्या दिलीप काळे व अमोल काळे यांना वॉर्डातून ओढून बाहेर आणले. यानंतर तेथील डॉक्टर, परिचारिका व नातेवाईकांची एकच पळापळ झाली. यातील काहींनी तत्काळ पोलिसांशी तसेच जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.