वृत्तसंस्था/ दुबई
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या पुरुषांच्या दुबई खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाचा टेनिसपटू डॅनिल मेदव्हेदेवने सर्बियाच्या टॉप सिडेड नोव्हॅक जोकोविचचे आव्हान संपुष्टात आणत एकेरीची अंतिम फेरी गाठली. आता रशियाच्या मेदव्हेदेव आणि रुबलेव या दोन टेनिसपटूंमध्ये जेतेपदासाठी लढत होईल.
या स्पर्धेतील झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात मेदव्हेदेवने टॉप सिडेड जोकोविचचा 6-4, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला. या पराभवामुळे जोकोविचची सलग 12 सामने जिंकण्याची विजयी घोडदौड संपुष्टात आली. 27 वर्षीय मेदव्हेदेवने एटीपी टूरवरील रोटरडॅम आणि दोहा येथील स्पर्धा जिंकल्या आहेत. हा उपांत्य फेरीचा सामना दीडतास चालला होता. 2021 च्या अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेत मेदव्हेदेवने जोकोविचचा पराभव केला होता.