यानिक सिनेर, डेव्हिड गॉफिन, बुझकोव्हा, नीमियर स्पर्धेबाहेर
वृत्तसंस्था/ लंडन
सहा वेळा एकेरीचे जेतेपद मिळविणारा सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचने दोन सेट्सची पिछाडी भरून काढत इटलीच्या यानिक सिनेरचे आव्हान संपुष्टात आणले आणि विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविले. ब्रिटनचा कॅमेरॉन नोरी, तसेच महिला एकेरीत टय़ुनिशियाची ऑन्स जेबॉर, जर्मनीची ताताना मारिया यांनीही उपांत्य फेरी गाठली तर डेव्हिड गॉफिन, ज्युल नीमियर, मेरी बुझकोव्हा यांचे आव्हान मात्र समाप्त झाले.
पुरुष एकेरीत अग्रमानांकित जोकोविचने विम्बल्डनमध्ये अकराव्यांदा उपांत्य फेरी गाठताना यानिक सिनेरवर 5-7, 2-6, 6-3, 6-2, 6-2 अशी मात केली. 35 वर्षीय जोकोविच आता या स्पर्धेत 26 सामने अपराजित राहिला आहे. दोन सेट्सची पिछाडी भरून काढत त्याने तिसऱया सेटपासून मुसंडी मारत हा विजय साकार केला. त्याची उपांत्य लढत ब्रिटनच्या नवव्या मानांकित कॅमेरॉन नोरीशी होईल. 26 वर्षीय नोरीने बेल्जियमच्या डेव्हिड गॉफिनला पाच सेट्सच्या झुंजीत 3-6, 7-5, 2-6, 6-3, 7-5 असा पराभवाचा धक्का देत शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले.
मारिया, जेबॉर आमनेसामने
महिला एकेरीत जर्मनीच्या ताताना मारियाने आपल्याच देशाच्या ज्युल नीमियरचा 4-6, 6-2, 7-5 असा चुरशीच्या लढतीत पराभव करून उपांत्य फेरी गाठली. दोन तास 18 मिनिटे ही लढत रंगली होती. 34 वर्षीय मारिया कारकिर्दीतील 46 वी ग्रँडस्लॅम खेळत असून त्यापैकी एकदाही तिला तिसरी फेरी पार करता आली नव्हती. तिची पुढील लढत टय़ुनिशियाच्या ऑन्स जेबॉरशी होईल. तिसऱया मानांकित जेबॉरने एका सेटची पिछाडी भरून काढत मेरी बुझकोव्हाचा 3-6, 6-1, 6-1 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठण्याची तिची ही पहिलीच वेळ आहे.
पुरुष दुहेरीत अग्रमानांकित राजीव राम व जो सॅलिसबरी यांनी 12 व्या मानांकित निकोलस मेहुत व एदुआर्द रॉजेर व्हॅसेलिन यांच्यावर अतिशय चुरशीच्या लढतीत 6-3, 6-7 (1-7), 6-1, 3-6, 6-4 अशी मात करून उपांत्य फेरीत स्थान मिळविले. मॅथ्यू एब्डन व मॅक्स पर्सेल या चौदाव्या मानांकित जोडीनेही शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविताना जॉन पीयर्स व फिलिप पोलॅसेक या सातव्या मानांकित जोडीचे आव्हान 6-4, 6-4, 6-2 असे संपुष्टात आणले.
महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत झँग शुआई व एलिस मर्टेन्स या अग्रमानांकित जोडीने उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करताना सातव्या मानांकित आंदेया क्लेपॅक व ऍलेक्सा ग्वाराची यांचा 6-3, 6-2 असा पराभव केला. मिश्र दुहेरीमध्ये दुसऱया मानांकित नील स्कुपस्की व डिजायरी क्रॅवझिक यांनी सातव्या मानांकित एलेना ओस्टापेन्को व रॉबर्ट फाराह यांचे आव्हान 7-6 (8-6), 6-1 असे संपुष्टात आणले तर दुसऱया सामन्यात मॅथ्यू एब्डन व समंथा स्टोसुर यांनी जॉनी ओमारा व ऍलिसिया बार्नेट यांचा 6-3, 6-1 असा पराभव केला. याशिवाय जॅक सॉक व कोको गॉफ यांनीही आगेकूच करताना उपांत्यपूर्व लढतीत ऍलिझ कॉर्नेट व एदुआर्द रॉजेर व्हॅसेलिन यांच्यावर 6-3, 6-4 अशी मात केली.