कानात जास्त मळ होणं ही तर सामान्य समस्या आहे. परंतु जर कानांची योग्य प्रकारे स्वच्छता झाली नाही तर कान दुखणं, खाज येणं, जळजळ होणं, ऐकायला कमी येणं अशा अनेक समस्या येऊ शकतात. यामुळे अनेक लोक कानांची स्वच्छता करण्यासाठी इयर बड्सचा वापर करतात. पण काहीवेळा इअर बड कानांसाठी घातक ठरू शकतं. इयर बड्सचा वापर करून जर कानांची स्वच्छता केली तर कोणत्या समस्या येतात याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
जर कानातील मळ काढताना इयर बड्सचा वापर केला तर कानातील मळ हा बाहेर येण्याऐवजी आणखी आत सरकण्याची शक्यता असते. हा मळ कानाच्या पडद्याला इजा होऊ शकते.
इयर बड्सवर कापूस लावलेला असतो. अनेकदा असंही होतं की, कापसाचा काही भाग कानाच्या आतच राहतो. मग जेव्हा अंघोळीवेळी कानात पाणी जातं तेव्हा हा कापूस ओला होतो. परिणामी कानाच्या आत फंगल इंफेक्शन होतं.
आपल्या कानात नैसर्गिकपणेच एक चिकट द्रव्य तयार होत असतं. ज्यामुळे कानात तयार होणारा मळ हा कानाच्या पडद्यापर्यंत पोहचत नाही. जेव्हा आपण इयर बड्सचा वापर करतो तेव्हा हे द्रव्य निघून जातं. यामुळं धूळ आणि माती ही कानाच्या पडद्यापर्यंत पोहचू शकते.
कान स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इयर बड्सवर कापूस असतो. याच कापसावर अनेक बॅक्टेरिया देखील असतात. जेव्हा आपण कान स्वच्छ करण्यासाठी याचा वापर करतो तेव्हा हेच बॅक्टेरिया कानाच्या आत जातात. यामुळं इंफेक्शन होण्याचीही शक्यता असते.