उपेंद्र कुशवाह यांच्याकडून नितीश कुमार लक्ष्य
वृत्तसंस्था/ पाटणा
संयुक्त जनता दलाचे नेते उपेंद्र कुशवाह यांनी पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. आमदार करत नितीश कुमारांनी केवळ लॉलीपॉप हाती दिले, परंतु आता मला पक्षात स्वतःची हिस्सेदारी हवी असे कुशवाह यांनी मंगळवारी म्हटले आहे.
कुठल्याही पदाची मला लालसा नाही, यापूर्वी मी केंद्रीयमंत्री पद सोडले होते. नितीश कुमार यांनी 1994 मध्ये लालूप्रसाद यादव यांच्याकडून ज्याप्रकारे हिस्सा मागितला होता, त्याचप्रकारे मला देखील हिस्सेदारी हवी आहे. हिस्सा घेतल्याशिवाय रिकामी हातांनी कुठेच जाणार नसल्याचे म्हणत कुशवाह यांनी एकप्रकारे नितीश कुमार यांना आव्हानच दिले आहे.
संजदमध्ये मला मोठा आदर देण्यात आल्याचे नितीश कुमार सांगतात, परंतु मला संसदीय मंडळाच्या अध्यक्षपदाचा खुळखुळा सोपविण्यात आला. पक्षाच्या संसदीय मंडळाचा अध्यक्ष झालो, परंतु संजदच्या घटनेत याला कुठलेच महत्त्व नाही. संसदीय मंडळाचा सदस्य नेमण्याचाही अधिकार माझ्याकडे नाही. उमेदवारांबद्दल विचार करण्याचा अधिकारही देण्यात आला नाही. निवडणुकीदरम्यान उमेदवारांच्या निवडीवरून माझ्या सूचना विचारात घेण्यात आल्या नाहीत असा आरोप कुशवाह यांनी केला आहे.
पक्षाच्या धोरणात्मक निर्णय घेणाऱया टीममध्ये अतिमागास समाजाचा कुठलाच नेता सामील करण्यात आलेला नाही. अतिमागास समाजाशी संबंधित नेत्याला राज्यसभा किंवा विधानपरिषदेवर पाठविण्याची शिफारस केली होती. मुख्यमंत्र्यांनी या शिफारसीकडे दुर्लक्षच केल्याचा दावा कुशवाह यांनी केला आहे.
हिस्स्यात काय हवे?
कुशवाह यांनी हिस्स्यात काय हवे हे देखील सांगितले आहे. 1994 मध्ये पाटण्याच्या गांधी मैदानात आयोजित एका सभेत नितीश कुमारांनी हिस्सेदारीचा मुद्दा मांडला होता, हा हिस्सा त्यांनी लालूप्रसाद यादव यांच्याकडून मागितला होता, आता त्याच धर्तीवर नितीश कुमार यांच्याकडून मी हिस्सा मागत असल्याचे कुशवाह यांनी म्हटले आहे. कुशवाह यांनी स्वतःचा पक्ष नितीश कुमार यांच्या संजदमध्ये विलीन केला होता.