वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हरारेमध्ये होणाऱया झिंबाब्वे विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताचा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे सहभागी होण्याची सांशकता निर्माण झाली आहे. ही मालिका 18 ऑगस्टपासून सुरू होईल.
लँकेशायर संघाकडून इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत खेळताना 10 ऑगस्ट रोजी एका सामन्यात मैदानावर सूर मारून झेल पकडण्याच्या प्रयत्नात त्याचा खांदा दुखावला होता. त्याच्या डाव्या खांद्याला ही दुखापत झाली असून त्याची ही दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झाली नाही. लंडनच्या ओल्ड ट्रफोर्ड मैदानावर रॉयल लंडन चषक वनडे क्रिकेट स्पर्धेतील लँकेशायर आणि वुर्सेस्टरशायर या दोन संघातील सामना खेळविण्यात आला होता. लँकेशायरचे प्रतिनिधीत्व करणाऱया वॉशिंग्टन सुंदरला क्षेत्ररक्षण करत असताना ही दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला रॉयल लंडन चषक स्पर्धेतील हॅम्पशायर विरुद्ध होणाऱया आगामी सामन्यासाठी लँकेशायरने 13 जणांचा संघ जाहीर केला असून वॉशिंग्टन सुंदरला वगळण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट संघ शनिवारी सकाळी हरारेला रवाना झाला. मध्यंतरी स्नायू दुखापतीमुळे वॉशिंग्टन सुंदरला मायदेशी झालेल्या विंडीज आणि लंकेविरुद्धच्या टी-20 मालिकामध्ये खेळता आले नव्हते. चालू वर्षामध्ये झालेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सनरायजर्स हेद्राबाद संघाकडून वॉशिंग्टन सुंदरला ही स्नायू दुखापत झाली होती. 2022 च्या जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयासाठी वॉशिंग्टन सुंदरला वनडे संघातून वगळण्यात आले होते. तत्पुर्वी कोरोना चाचणीत तो पॉझिटिव्ह आढळला होता. वॉशिंग्टन सुंदरला सय्यद मुश्ताकअली टी-20 क्रिकेट स्पर्धाही हुकली होती. तो तामिळनाडू संघाकडून खेळत असतो. झिंबाब्वेच्या दौऱयात नियमित प्रशिक्षक राहुल द्रविडला काही दिवसांसाठी विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मणकडे प्रशिक्षक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.