सचिन शिरगावकर उपाध्यक्षपदी : 2022 ते 2027 कालावधीसाठी संचालक मंडळाची निवड बिनविरोध
प्रतिनिधी/कोल्हापूर
येथील युथ डेव्हलपमेंट को-ऑप बँकेच्या सन 2022 ते 2027 सालासाठी संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली. बँकेच्या अध्यक्षपदी थायलंड सरकारच्या वित्त मंत्रालयाचे वाणिज्य सल्लागार आणि इंडियन डेअरी असोसिएशनचे संचालक डॉ. चेतन नरके तसेच उपाध्यक्षपदी उद्योजक सचिन शिरगावकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
निवड प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी.के. पाटील यांनी कामकाज पहिले. यावेळी जेष्ठ संचालक अरुण नरके, माजी अध्यक्ष आर.पी. पाटील, विश्वास जाधव, कार्यकारी संचालक आर.बी. सूर्यवंशी यांच्यासह इतर संचालक आणि कर्मचारी उपस्थित होते.
ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा, 500 कोटींच्या ठेवींचे लक्ष्य : डॉ. नरके
निवडीनंतर प्रतिक्रिया देताना अध्यक्ष डॉ. चेतन नरके म्हणाले, बहुजनांची युथ डेव्हलपमेंट को-ऑप बँक लवकरच सुवर्ण महोत्सव साजरा करणार आहे. गेल्या 45 वर्षाहून अधिक काळ कोल्हापूर जिह्यातील शेतकरी, उद्योजक, व्यापारी आणि व्यवसायिक यांच्या प्रगतीमध्ये बँकेचे योगदान मोठे आहे. 2025 सालापर्यंत सभासद तसेच ग्राहकांना बँकिंग क्षेत्रातील अत्याधुनिक सेवा सुविधा देण्यासोबत 500 कोटीच्या ठेवींचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. यासाठी संचालक मंडळात सर्व क्षेत्रातील लोकांचा समावेश केला आहे. बँकिंग क्षेत्रातील दर्जेदार सुविधांसह कृषी, दुग्धव्यवसाय,महिला, बेरोजगार यांच्यासाठी विशेष योजना आणि इतर पूरक सेवा देखील देणार आहे.