दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच लक्ष्य : युक्रेनवर व्यक्त होतोय संशय
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये 2 इमारतींवर ड्रोनद्वारे हल्ले झाले आहेत. दोन्ही इमारतींमध्ये राहत असलेल्या नागरिकांना तेथून हटविण्यात आले आहे. मॉस्कोचे महापौर सर्गेई सोबयानिन यांची या हल्ल्यांच पुष्टी दिली आहे. या हल्ल्यांमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. तर मंगळवारी सकाळी रशियाकडून सुमारे 10 ड्रोन नष्ट करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.
हल्ला करणारे ड्रोन युक्रेनकडून पाठविण्यात आले होते, परंतु हे सर्व ड्रोन नष्ट करण्यात आल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी हल्ल्यांनतर मॉस्कोमध्ये झालेला हा पहिलाच हल्ला होता असे वक्तव्य रशियाचे खासदार मॅक्सिम इवानोव्ह यांनी केले आहे.
तर दुसरीकडे रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हला लक्ष्य करत मंगळवारी पहाटे हवाई हल्ले केले आहेत. तर युक्रेनच्या हवाई सुरक्षा प्रणालीने मोठ्या संख्येत ड्रोन नष्ट केले आहेत. कीव्हच्या हवाईक्षेत्रात 20 हून अधिक शहीद ड्रोन (इराणकडून निर्मित) नष्ट करण्यात आल्याचे युक्रेनच्या सैन्याकडून सांगण्यात आले.
होलोसीव्ह जिल्ह्यात एका बहुमजली इमारतीला आग लागल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. इमारतीचे दोन मजले नष्ट झाले असून त्याच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकून पडल्याचा संशय आहे. रशियाकडून युक्रेनच्या दिशेने बॅलेस्टिक क्रूझ क्षेपणास्त्रs डागण्यात आली होती, परंतु ती आकाशातच नष्ट करण्यात आल्याचा दावा युक्रेनचे चीफ ऑफ स्टाफ वलेरी जालुजनी यांनी केला आहे.