बहुतांश राज्यांमध्ये हादरे : जीवितहानीची नोंद नाही
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अफगाणिस्तानसह उत्तर भारतातील बहुतांश राज्यात रविवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवल्याने घबराट पसरली. जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी सकाळी 11.15 च्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6 इतकी मोजली गेली. या भूकंपाची तीव्रता दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्येही जाणवली. अफगाणिस्तानातील फैजाबादपासून 79 किमी आग्नेयेला भूकंपाचा केंद्रबिंदू होता. हा भूकंप जमिनीपासून 220 किमी खोलीवर होता. अफगाणिस्तानमधील भूकंपामुळे चीन, पाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि किर्गिस्तानच्या अनेक भागातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मात्र, कोणत्याही देशात नुकसान झाल्याचे वृत्त नाही. यापूर्वी आसाममधील तेजपूर येथे रविवारी पहाटे 3.58 वाजता भूकंपाचा धक्का बसला. त्याची तीव्रता 3.3 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली.