वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा 17 वर्षाखालील वयोगटाचा पुरुषांच्या फुटबॉल संघ सध्या सरावासाठी जर्मनीत दाखल झाला आहे. या दौऱ्यामध्ये भारतीय कनिष्ठ फुटबॉल संघ जर्मनीतील विविध 17 आणि 18 वर्षीय वयोगटाखालील क्लबस्तरीय फुटबॉल संघाबरोबर सरावाचे सामने खेळत आहे. आता भारतीय कनिष्ठ फुटबॉल संघाचा शेवटचा सरावाचा सामना सोमवारी टीएसव्ही स्केव्हाबेन ऑगेसबर्गशी होणार आहे.
भारतीय कनिष्ठ फुटबॉल संघाला आंतरराष्ट्रीय सामन्यांचा सराव व्हावा या दृष्टीकोनातून अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने या संघाकरीता जर्मनीचा दौरा आयोजित केला. या दौऱ्यापूर्वी भारतीय कनिष्ठ पुरुष फुटबॉल संघाचा मुक्काम तब्बल एक महिना स्पेनमध्ये होता. स्पेनमध्ये भारतीय कनिष्ठ फुटबॉल संघाला अनेक क्लबस्तरीय संघांबरोबर खेळण्याची संधी मिळाली आहे. पुढील महिन्यात थायलंड येथे होणाऱ्या एएफसी 17 वर्षाखालील आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत भारताचा सहभाग राहणार आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना 17 जूनला व्हिएतनाम बरोबर, दुसरा सामना 20 जूनला उझ्बेकबरोबर, तिसरा सामना 23 जूनला जपान बरोबर होणार आहेत. या स्पर्धेत भारतीय संघाचा ड गटात समावेश आहे.