बेळगाव : जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील ग्राम पंचायतच्या पोटनिवडणुका घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील ग्राम पंचायतमधील रिक्त जागांची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी त्या भागामध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली असून 14 फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करण्यास मुदत राहणार आहे. 15 फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी होणार आहे तर 17 फेब्रुवारी रोजी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5 पर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. काही ठिकाणी आवश्यकता भासल्यास 27 फेब्रुवारी रोजी पुन्हा मतदान घेतले जाणार आहे. 28 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील नरसापूर ग्राम पंचायतमधील एक जागा, बेळगाव तालुक्यातील बोकनूर ग्राम पंचायतमधील एक जागा, हिरेबागेवाडी ग्राम पंचायतमधील एक जागा, मोदगा ग्राम पंचायतमधील एक जागेसाठी निवडणूक होणार आहे. याचबरोबर खानापूर तालुक्यातील गंदिगवाड येथील एक जागा, कागवाड तालुक्यातील उगार खुर्द ग्राम पंचायतीची एक जागा, गोकाक तालुक्यातील बसळीगुंड ग्राम पंचायतीमधील एक जागेसाठी निवडणूक होणार आहे. जिल्ह्यातील विविध ग्राम पंचायतमधील एकूण 7 जागांची पोटनिवडणूक होणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली आहे.