कराड / प्रतिनिधी :
इलेक्ट्रिक बाईकची बॅटरी चार्जिंगला लावत असताना शॉक लागून युवतीचा मृत्यू झाला. कराड तालुक्यातील म्होप्रे येथे शुक्रवारी (दि. 20) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
शिवानी अनिल पाटील (वय 23, रा. म्होप्रे, ता. कराड) असे शॉक लागून मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, म्होप्रे येथील युवती शिवानी पाटील ही आपल्या इलेक्ट्रिक बाईकची बॅटरी चार्जिंगला लावण्यासाठी गेली असता तिला अचानकपणे शॉक लागला. ही बाब लक्षात येताच नातेवाईकांनी त्यांना त्वरीत उपचारासाठी कराडला रुग्णालयात हलवले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. याची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल खाडे करत आहेत.