प्रतिनिधी /वास्को
वास्को शहरातील कर्मा पॉईन्ट या व्यवसायीक इमारतीबाहेर उभारण्यात आलेला बेकायदा व्यवसायीक गाडा मुरगाव पालिकेने सोमवारी सकाळी हटवला. तोडमोड करूनच तो गाडा हटवावा लागला. रविवारच्या सुट्टीचा लाभ घेत त्या इमारतीच्या पायऱयांखाली हा गाडा उभारण्यात आला होता.
हा पक्का गाडा लोखंड व पत्र्याचा वापर करून उभारण्यात आला होता. त्यासाठी इमारतीचा आधार घेण्यात आला होता. त्याला शटरही लावण्यात आले होते. मात्र, हा गाडा कुणाचा व कुणी उभारला याची माहिती पालिकेने उघड केलेली नाही. रविवारी मुरगावचे नगराध्यक्ष लियो रॉड्रिक्स यांना कुणी तरी बेकायदेशीररीत्या गाडा उभारला असल्याची माहिती मिळाली होती. मात्र, रविवार सुट्टीचा दिवस असल्याने कारवाई होऊ शकली नाही. सोमवारी सकाळी नगराध्यक्ष लियो रॉड्रिक्स यांनी स्वतः उपस्थित राहून जेसीबीच्या साहाय्याने हा गाडा हटवला. त्यामुळे खासगी मालमत्तेत अतिक्रमण करण्याचा अज्ञाताचा प्रयत्न फसला. मात्र, कुणाही व्यक्तीविरूध्द या प्रकरणी पोलीस तक्रार झालेली नाही.