तिसऱ्या टी-20 मध्ये 16 धावांनी बांगलादेशाचा विजय, लिटॉन दास सामनावीर, नजमूल हुसेन शांतो मालिकावीर
वृत्तसंस्था/ मीरपूर
यजमान बांगलादेशने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत इंग्लंडचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात बांगलादेशने इंग्लंडचा 16 धावांनी पराभव केला. बांगलादेशच्या लिटॉन दासला ‘सामनावीर’ तर नजमूल हुसेन शांतोला ‘मालिकावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या शेवटच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजी दिली. बांगलादेशने 20 षटकात 2 बाद 158 धावा जमवत इंग्लंडला विजयासाठॅ 159 धावांचे आव्हान दिले पण त्यानंतर बांगलादेशच्या अचूक गोलंदाजीसमोर इंग्लंडने 20 षटकात 6 बाद 142 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना या मालिकेत आपला व्हाईटवॉश टाळता आला नाही.
या सामन्यात बांगलादेशच्या डावात सलामीच्या लिटॉन दासने 57 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारासह 73, रोनी तालुकदारने 22 चेंडूत 3 चौकारासह 22, नजमूल हुसेने शांतोने 36 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 47 तर शकीब अल हसनने नाबाद 4 धावा जमवल्या. दास आणि तालुकदार यांनी सलामीच्या गड्यासाठी 7.3 षटकात 55 धावांची भागीदारी केली. तालुकदार बाद झाल्यानंतर दास आणि नजमूल हुसेन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 84 धावांची भर घातली. बांगलादेशच्या डावात 3 षटकार आणि 14 चौकार नोंदवले गेले. इंग्लंडतर्फे आदिल रशीद आणि जॉर्डन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या डावामध्ये सलामीच्या डेव्हिड मलानने 47 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारासह 53 तर कर्णधार बटलरने 3 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारासह 40 धावा जमवल्या. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 95 धावांची भागीदारी केली. सॉल्टला आपले खाते उघडता आले नाही. डकेटने 2 चौकारासह 11, मोईन अलीने 1 षटकारासह 9, सॅम करनने 4, वोक्सने 10 चेंडूत 2 चौकारासह नाबाद 13 तर जॉर्डनने नाबाद 2 धावा जमवल्या. बांगलादेशतर्फे तस्कीन अहमदने 2 तर तन्वीर इस्लाम, शकीब अल हसन, मुस्तफिजूर रेहमान यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. इंग्लंडच्या डावात 4 षटकार आणि 14 चौकार नोंदवले गेले.
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश 20 षटकात 2 बाद 158 (लिटॉन दास 73, तालुकदार 24, नजमूल हुसेन शांतो नाबाद 47, शकीब अल हसन नाबाद 4, अवांतर 10, आदिल रशीद 1-23, जॉर्डन 1-21), इंग्लंड 20 षटकात 6 बाद 142 (डेव्हिड मलान 53, बटलर 40, डकेट 11, मोईन अली 9, सॅम करन 4, वोक्स नाबाद 13, जॉर्डन नाबाद 2, सॉल्ट 0, अवांतर 10, तन्वीर इस्लाम 1-17, तस्कीन अहमद 2-26, शकीब अल हसन 1-30, मुस्तफिजूर रेहमान 1-14).