वृत्तसंस्था/ अलूर
2023 च्या क्रिकेट हंगामातील येथे सुरू असलेल्या दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात शनिवारी खेळाच्या शेवटच्या आणि चौथ्या दिवशी मध्य विभागाने पूर्व विभागाचा 170 धावांनी दणदणीत पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. पूर्व विभागाच्या दुसऱ्या डावात 64 धावात 8 गडी बाद करणाऱ्या मध्य विभागाच्या सौरभ कुमारला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात मध्य विभागाचा पहिला डाव 182 धावात आटोपला. त्यानंतर पूर्व विभागाचा पहिला डाव 42.2 षटकात 122 धावात संपुष्टात आल्याने मध्य विभागाने 60 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर मध्य विभागाने दुसऱ्या डावात सर्व बाद 239 धावा जमवल्या. पूर्व विभागाला विजयासाठी 300 धावांचे आव्हान मध्य विभागाने दिले. सौरभ कुमारच्या भेदक गोलंदाजीसमोर पूर्व विभागाचा दुसरा डाव 41.2 षटकात 129 धावात आटोपला. पूर्व विभागाने 6 बाद 69 या धावसंख्येवरून शेवटच्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली आणि त्यांचे शेवटचे चार 60 धावांची भर घालत तंबूत परतले. या सामन्यामध्ये मध्य विभागाचा सौरभ कुमार याची गोलंदाजी निर्णायक ठरली. त्याने या सामन्यात एकूण 11 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : मध्य विभाग प. डाव सर्व बाद 182, पूर्व विभाग प. डाव 42.2 षटकात सर्व बाद 122, मध्य विभाग दु. डाव 87.5 षटकात सर्व बाद 239, पूर्व विभाग दु. डाव 41.2 षटकात सर्व बाद 129 (सौरभ कुमार 8-64).