घरगुती-व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कोणताही बदल नाही
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शनिवार, 1 जुलै रोजी एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जारी करण्यात आले असून घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. दर महिन्याच्या 1 तारखेला गॅस सिलिंडरच्या दरात बदल होत असतात. मात्र, या महिन्यात दरात कोणताही बदल न झाल्याने गृहिणींसह कमर्शियल सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
मार्च महिन्यापासून घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मार्चमध्ये एलपीजी सिलिंडरमध्ये 50 ऊपयांची वाढ झाली होती. गेल्या महिन्यात जूनमध्ये व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या किमतीत 83 ऊपयांनी कपात करण्यात आली होती. तत्पूर्वी, मे महिन्यात देखील व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत घट झाल्यामुळे एका सिलिंडरची किंमत 1,856.50 ऊपयांवर पोहोचली होती. एप्रिलमध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत 2,028 रुपये होती. तर मार्चमध्ये त्याची किंमत सर्वाधिक 2,119.50 रुपये होती.
जुलै महिन्याच्या प्रारंभी जाहीर झालेल्या दरानुसार 14.2 किलो एलपीजी सिलिंडर आणि 19 किलो कमर्शियल सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये स्वयंपाकघरातील वापरासाठी एलपीजी सिलिंडरची किंमत 1,103 रुपये आणि व्यावसायिक वापराच्या सिलिंडरची किंमत 1,773 रुपये आहे. तर, मुंबईत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 1,102.50 रुपये आणि व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1,725 रुपये इतकी कायम आहे.