उत्पादनात घट : कामगारांचेही नुकसान, सुरळीत वीजपुरवठा करण्याचे आश्वासन
बेळगाव : हेस्कॉमकडून केल्या जात असलेल्या अघोषित भारनियमनामुळे उद्योगक्षेत्र अडचणीत आले आहे. लघुउद्योजक तर आर्थिक तोट्यात असून वीजदरवाढीने होरपळून निघत आहेत. एकीकडे दरवाढ केली जाते तर दुसरीकडे कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे औद्योगिक वसाहतीमध्ये भारनियमन करू नये, अशी मागणी चेंबर ऑफ कॉमर्सने हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना केली. हेस्कॉम व चेंबर ऑफ कॉमर्सची संयुक्त बैठक मंगळवारी चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात पार पडली. बैठकीला हेस्कॉमचे मुख्य अभियंता प्रकाश उपस्थित होते. उद्योजकांनी त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या. बऱ्याच वेळा पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने त्याचा परिणाम उद्योगांवर होत आहे. जोवर वीज देणार नाही, तोवर कामगारांच्या हाताला काम मिळत नसल्याने कामगारांचेही नुकसान होत आहे. औद्योगिक क्षेत्रातून हेस्कॉमला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असल्याने असे प्रकार टाळावेत, अशी मागणी उद्योजकांनी केली. हेस्कॉमचे मुख्य अभियंता प्रकाश तसेच कार्यकारी अभियंता प्रवीणकुमार चिकार्डे यांनी उद्योजकांशी संवाद साधून औद्योगिक वसाहतींमध्ये भारनियमन केले जाणार नाही, असे सांगितले. काही वेळा विद्युतवाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यास अल्पावधीसाठी वीजपुरवठा खंडित केला जातो. परंतु, भारनियमनाचा विचार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सी. सी. होंदडकट्टी, सचिव किथ मचाडो, उपाध्यक्ष संजीव कत्तीशेट्टी, सतीश कुलकर्णी, आनंद देसाई, उदय जोशी, हेस्कॉमचे साहाय्यक कार्यकारी अभियंता विनोद करुर, ए. एम. शिंदे यासह इतर उपस्थित होते.