अनगोळ परिसरातील प्रकार
प्रतिनिधी/ बेळगाव
अचानक वीजेचा दाब वाढल्याने नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे निकामी झाल्याची घटना शनिवारी घडली. अनगोळ येथील झेरेगल्ली, कोनवाळ, आंबेडकर नगर, परिसरात ही घटना घडली. यामध्ये नागरिकांच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले असून, हेस्कॉमने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.
शनिवारी सकाळी 6.30 ते 7 च्या सुमारास रिमझीम पाऊस सुरू असताना अनगोळ येथील झेरेगल्ली, कोनवाळ, आंबेडकर नगर, कनकदास नगर या परिसरात अचानक वीजेचादाब वाढल्याने नागरिकांच्या घरातील इलेक्ट्रॉनिक साहित्याचे नुकसान झाले. टीव्ही, फॅन, बल्ब, सेटअप बॉक्स, मोबाईल चार्जर यासह इतर साहित्य जळल्याची घटना घडली आहे. काही घरांमध्ये विद्युत वाहिन्याही निकामी झाल्या असल्याने नागरिकांना आर्थिक नुकसान सोसावे लागले.
अचानक घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वापावरण पसरले होते. भितीपोटी अनेक नागरिकांनी आपल्या घरातील विद्युत पुरवठा बंद करणे पसंद केले. दिवसभर सिंगलफेज विद्युतपुरवठा सुरू होता. सायंकाळी 6 वा. हेस्कॉमच्या कर्मचाऱयांनी ट्रान्सफॉर्मर दुरूस्त करून वीजपुरवठा सुरळीत केला.
अनगोळ कनकदास कॉलनी येथील ट्रान्सफॉर्मरवर प्रमाणापेक्षा अधिक भार वाढल्यामुळे आणखी एक ट्रान्सफॉर्मर बसविण्याची मागणी होत आहे. नागरिकांनी मागणी करूनही हेस्कॉमकडून टाळाटाळ केली जात असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.