प्रतिनिधी/ मडगाव
चंद्रावाडो -फातोर्डा येथील एका स्क्रॅप यार्डात बुधवारी स्फोट होऊन दोन कामगार होरपळले. जखमीना सरकारी इस्पितळात नेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या स्क्रॅप यार्डात येत असलेल्या अनेक जुन्या वाहनांचे सुटे भाग करण्यात येतात आणि हे सुटे भाग करीत असताना गॅस कटरचा वापर करण्यात येतो. असाच एक प्रकार बुधवारी चालू असताना स्फोट झाला आणि या स्फोटात दोन कामगार होरपळले.
या प्रकाराची खबर कळताच फातोर्डा पोलीस घटनास्थळी आले व त्यांनी पोलिसी प्रक्रिया सुरु केली आणि जखमीना इस्पितळात हलविले.
बेकायदेशीर स्क्रॅपयार्ड
या स्फोटासंबंधी स्थानिक लोकांनी तीव्र प्रतिकिया व्यक्त केली. हा स्क्रॅप यार्ड बेकायदेशीर असून या स्क्रॅप यार्डला सां जुझे दी आरियाल येथे जागा दिलेली असतानाही या जागेत (चंद्रावाडो) बेकायदेशीररित्या काम चालू असल्यामुळे प्रशासनाने ही संपूर्ण जागाच सील केलेली बरी अशी प्रतिक्रिया एका स्थानिकांने व्यक्त केली.
कामीलो बार्रेटो यांनी या प्रकरणी आपली कडवट प्रतिक्रिया व्यक्त केली. येथे विद्यालय असून सुमारे 400 विद्यार्थी असतात. शिवाय रस्त्यावरुन दाटीदाटीने लोक ये -जा करीत असतात. अशा प्रसंगी काही मोठा अनर्थ घडला तर त्याला जबाबदार कोण असा सवाल केला आणि आतातरी प्रशासनाने हा स्क्रॅप यार्ड बंद करावा अशी विनंती त्यांनी केली.
अनेकांची घरे मोडून सरकारने या परिसरातील रस्ता रुंद केला खरा मात्र या स्क्रॅप यार्डमुळे अनेकजण रस्त्याच्या बाजुला वाहने पार्क करुन ठेवत असल्यामुळे रस्ता रुंद करुन काय साध्य केले असा सवाल दुसऱया एका स्थानिकाने केला.