वर्षभरात 90 मुलांना देणार सरकारी रोजगार : आतापर्यंत 270 जणांना दिल्या नोकऱ्या,सध्या दिलेली ऑफर मुलांनी नाकारली
- मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती
- येत्या 17, 18 रोजी प्रशासन तुमच्या दारी उपक्रम
- फाईव्ह जी नेटवर्क कनेक्टिव्हीटीसाठी धोरणात बदल
पणजी : स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना सरकारी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला आणखी एका वर्षाची मुदतवाढ देणे, ‘प्रशासन तुमच्या दारी’ अंतर्गत दि. 17 आणि 18 रोजी राज्यभरात लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेणे, गोव्यात होणाऱ्या जी20 शिखर बैठकांच्या तयारीचा आढावा घेणे, मोबाईलच्या 5जी नेटवर्कसाठी गोवा टेलेकॉम इफ्रा धोरणात दुऊस्ती करणे, गोवा गॅझेटर अॅण्ड हिस्टोरिकल रेकॉर्डस् हे नवीन निर्माण करणे यासारखे निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले. त्यानंतर दुपारी विधानसभा परिषदगृहात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना सरकारी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला मंत्रीमंडळाने आणखी एका वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढील वर्षभरात स्वांतत्र्यसैनिकांच्या 90 मुलांना सरकारी सेवेत सामावून घेण्यात येईल. योजनेसाठी ही शेवटची मुदतवाढ असेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
उर्वरीत 90 मुलांना वर्षभरात रोजगार
आतापर्यंत स्वातंत्र्यसैनिकांच्या सुमारे 270 मुलांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. तत्पूर्वी 150 जणांना नोकऱ्या दिल्या होत्या. आता एकुण 90 मुले शिल्लक आहेत. त्यांना वर्षभरात रोजगार मिळवून देण्यात येईल. तत्पूर्वी या मुलांना सध्या मनुष्यबळ विकास महामंडळातर्फे नोकरीत सामावून घेऊ, आणि नंतर जेव्हा रिक्त पदे निर्माण होतील तेव्हा त्यांचा प्राधान्याने विचार करू, अशी ऑफर दिली होती. परंतु त्यांनी ती धुडकावली, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
येत्या 17, 18 रोजी ‘प्रशासन तुमच्या दारी’
यंदा आपल्या सरकारचा चार वर्षांचा कार्यकाळ आणि केंद्रातील मोदी सरकारचा 9 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने दि. 17 व 18 एप्रिल रोजी ‘प्रशासन तुमच्या दारी’ हा उपक्रम राज्यभरात राबविण्यात येणार आहे. दोन्ही दिवसात सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत प्रत्येकी एक मंत्री संबंधित उपजिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित राहणार आहे. त्या दरम्यान ते लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेतील. त्यावेळी प्रशासनात सचिव असलेले आयएएस अधिकारीही उपस्थित राहणार आहेत, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
फाईव्ह जी नेटवर्क कनेक्टिव्हीटी
राज्यात फाईव्ह जी नेटवर्कची कनेक्टिव्हीटी करण्यासाठी गोवा दूरसंचार पायाभूत सुविधा धोरणात सुधारणा, बदल करण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मोबाईल वा ब्रॉडबँड कनेक्टिव्हीटीद्वारे इंटरनेट कनेक्टिव्हीटीची मागणी वाढल्यामुळे या धोरणांतर्गत दूरसंचार क्षेत्रातील कार्यक्षमता वाढविणे तसेच लोकांना जलद आणि विश्वासार्ह सेवा देऊन त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे शक्य होणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. जी 20 शिखर परिषदेच्या तयारीचा आढावाया बैठकीत मुख्यमंत्र्यांनी गोव्यात होणाऱ्या जी 20 शिखर बैठकांच्या तयारीचाही आढावा घेतला. पर्यटन, आरोग्य, शिक्षण आणि शाश्वतता यासारख्या विषयांवर गोव्यात एकुण 8 बैठका आयोजित करण्यात येणार आहेत. त्यातील पहिली बैठक दि. 17 एप्रिल रोजी होणार आहे. यातील बहुतेक बैठका बांबोळी आणि दोनापावल येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये होतील, अशी माहिती सावंत यांनी दिली.