बेळगाव : शेतकऱ्यांना पीक कर्ज काढण्यासाठी आता एफआयडी क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे कर्जासाठी शेतकऱ्यांना प्रथम आयडी क्रमांक द्यावा लागणार आहे. जवळच्या रयत संपर्क केंद्रात, बागायत खाते आणि पशु वैद्यकीय दवाखान्यातून आयडी क्रमांक उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना कर्जासाठी सातबारा उतारा आणि इतर कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्याबरोबर आता आयडी देखील द्यावा लागणार आहे. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी उतारा, पीक पहाणी उतारा व इतर आवश्यक कागदपत्रे देणे बंधनकारक आहे. त्यात आता एफआयडी क्रमांकाचीदेखील भर पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी एफआयडी मिळविण्यासाठी धडपड करावी लागणार आहे. सातबारा उतारा, आधारकार्ड, रेशनकार्ड आदी कागदपत्रे बँक खात्याशी लिंक करण्यात आली आहेत. त्यामुळे संबंधीत शेतकऱ्याची सर्व माहिती बँकेत उपलब्ध होते. मात्र आता एफआयडी बंधनकारक केल्याने शेतकऱ्यांना रयत संपर्क केंद्राच्या पायऱ्या झिजवाव्या लागणार आहेत. कृषी खात्याचा कारभार डिजिटल झाला आहे. सर्रास कागदपत्रे ऑनलाईनद्वारे उपलब्ध केली जातात. सातबारा उतारा, शिधा पत्रिका, आधारकार्ड यासह इतर कागदपत्रांची ऑनलाईन नोंद खात्याकडे आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची नोंद देखील ई अॅपद्वारे ऑनलाईन पद्धतीने केली जाते. आता कर्जासाठी या सर्व कागदपत्राबरोबर एफआयडी आवश्यक बनली आहे.
आर. बी. नायकर (तालुका कृषी अधिकारी)
शेतकऱ्यांना कृषी लोनसाठी एफआयडी सक्तीची करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना रयत संपर्क केंद्रात आयडी दिला जातो. इतर कागदपत्रांबरोबर आयडीची पूर्तता करून कर्ज घ्यावे. कर्ज योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.