चौथे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाचा आदेश
बेळगाव : बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे यांनी शहरातील विविध भूखंड बेकायदेशीररित्या लिलाव करून विक्री करण्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता पोलीस व लोकायुक्त पोलिसांनी टाळाटाळ केली. फिर्यादी राजकुमार टोपण्णावर यांनी या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. मात्र त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्या विरोधात न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करण्यात आली होती. त्याठिकाणी न्यायालयाने प्रीतम नसलापुरे यांच्यावर एफआयआर दाखल करून त्यांची चौकशी करावी. त्यानंतर तो अहवाल न्यायालयात दाखल करावा, असा आदेश चौथे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाने दिला आहे. शहर विकास प्राधिकरणाचे आयुक्त प्रीतम नसलापुरे यांनी रामतीर्थनगर, एच.डी. कुमारस्वामी लेआऊट, लक्ष्मी टेकडी, राणी चन्नम्मानगर या परिसरातील भूखंडांचा बेकायदेशीर लिलाव केला होता. यामुळे जवळपास बुडाचे 100 ते 150 कोटींचे नुकसान झाले, अशी खासगी फिर्याद न्यायालयात राजकुमार महादेव टोपण्णावर यांनी दाखल केली. न्यायाधीश मोहन प्रभू यांनी त्यांची बाजू ऐकून घेऊन आता लोकायुक्त पोलिसांना सदर अधिकाऱ्यांवर एफआयआर दाखल करून चौकशी करण्याचे आदेश दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.
राजकुमार टोपण्णावर यांनी बुडाच्या भूखंडांमध्ये गैरप्रकार झाल्यानंतर पोलिसांना व लोकायुक्तांकडे तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आयुक्तांच्या विरोधात फिर्याद नोंदवून घेतली नाही. यामुळे त्यांनी न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती. न्यायालयाने याप्रकरणी लोकायुक्त पोलिसांना संबंधित अधिकाऱ्यांवर एफआयआर दाखल करून चौकशीचा अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बुडाचे आयुक्त प्रीतम नसलापुरे यांना चांगलाच दणका बसला आहे. खासगी फिर्याद दाखल करताना 101 प्लॉट्सची विक्री केल्याचे त्यांनी म्हटले आहे. जवळपास यामध्ये 100 ते 150 कोटींचा गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कलम 120बी, 405, 406, 420, 425, 463, 464, 465, 466, 468, 477-ए आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अन्वये गुन्हा दाखल करावा, असे या खासगी फिर्यादीत म्हटले होते. त्यानंतर न्यायालयाने बेळगावचे लोकायुक्त डीवायएसपी यांना या प्रकरणाचा तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.