वृत्तसंस्था/ कॅलिफोर्निया
एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या इंडियन वेल्स मास्टर्स बीएनपी पेरीबस आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महिलांच्या विभागात मारिया सॅकेरी आणि पोलंडची टॉपसिडेड इगा स्वायटेक यांनी एकेरीची अंतिम फेरी गाठली. सॅकेरीने उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफचा तर स्वायटेकने युक्रेनच्या कोस्ट्यूकचा पराभव केला.
या स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात सॅकेरीने अमेरिकेच्या टॉपसिडेड तसेच अमेरिकन ग्रँडस्लॅम विजेत्या कोको गॉफचा 6-4, 6-7 (5-7), 6-2 असा फडशा पाडत अंतिम फेरी गाठली. हा उपांत्य सामना दोन तास, 41 मिनिटे चालला होता. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत सॅकेरी आता दुसऱ्यांदा जेतेपदासाठी स्वायटेकशी लढत देणार आहे. 2022 साली स्वायटेकने अंतिम सामन्यात सॅकेरीचा पराभव केला होता. दुसऱ्या उपांत्य सामन्यात पोलंडच्या इगा स्वायटेकने युक्रेनच्या 32 व्या मानांकीत मार्टा कोस्ट्यूकचा 6-2, 6-1 असा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. स्वायटेकने हा सामना 69 मिनिटात जिंकला. स्वायटेकने आतापर्यंत 4 वेळा ग्रँडस्लॅम अजिंक्यपद मिळविले आहे.