काकोडा येथे महिला जखमी : घरावर वीज कोसळल्याने फटका : नावेली येथे घरावर कोसळले झाड : फेस्ताच्या फेरीतील दुकानांचे नुकसान
प्रतिनिधी / मडगाव
दक्षिण गोव्याला बुधवारी रात्री पहिल्या पावसाने जबरदस्त दणका दिला. त्यामुळे अनेकांना आर्थिक फटका बसला. कुडचडे-काकोडा येथील रिमा गवळी या गरीब महिलेच्या घरावर वीज कोसळण्याची घटना घडली. घरावर वीज पडल्याने महिलेच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. काल गुऊवारी पहाटे सहाच्या सुमारास ही घटना घडली. सासष्टीत नावेली व तळावली येथे घरांवर झाडे कोसळल्याने हानी झाली. मडगावात फेस्ताच्या फेरीतील स्टॉल्सधारकांना जबरदस्त फटका बसला. पहिल्याच पावसात मडगाव पालिकेच्या दारात पाणी साचले.
- मडगाव पालिकेच्या दारात पाणी
- मडगाव स्टेशन रोड गेला पाण्याखाली
- कुडचडे आंबेडकर सर्कल जलमय
काकोडा येथील रिमा गवळी हिच्या घरावर वीज कोसळल्याने घराची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. विजेची उपकरणे जळून खाक झाली आहेत. तसेच घराच्या भिंतीना तडे गेले आहेत. रिमा यांच्या चेहऱ्याला व डोक्याला विजेचा धक्का लागल्याची माहिती त्यांनी दिली. आपल्याला सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
फेरीवाल्यांना अर्थिक फटका
बुधवारी रात्री मडगावात पावसाने वादळीवाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. त्यावेळी काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. पुन्हा गुऊवारी पहाटे वादळी वाऱ्यासह पाऊस पडू लागल्याने लोकांची तारांबळ उडाली. वादळी वाऱ्यामुळे एसजीपीडीए मैदानावरील फेस्ताच्या फेरीतील दुकानांचे छप्पर कोसळून नुकसान झाले. फेस्तातील स्टॉल्सधारकांना बराच आर्थिक फटका बसला. फेरीतील फर्निचर खराब झाले. त्याचबरोबर तयार कपडे व इतर वस्तू विक्री करणाऱ्यांना बराच फटका बसला आहे.
मडगाव पालिकेच्या दारात पाणी
मडगाव पालिकेच्या दारात पहिल्याच पावसाचे पाणी आले. शहरातील रस्ते उंच व इतर भाग खाली अशी परिस्थिती झाल्याने पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. त्यामुळे पाणी सरळ पालिकेच्या दारापर्यंत पोहोचले होते. तसेच या परिसरातील काही दुकानांमध्ये पाणी शिरले होते. मडगाव उद्यान तसेच पालिकेच्या परिसरातील गटार व्यवस्था बरोबर नसल्याने ही परिस्थिती उद्भवल्याची प्रतिक्रिया शॅडो काऊंसिलचे सावियो कुतिन्हो यांनी व्यक्त केली.
मडगाव पालिकेने युद्ध पातळीवर गटार व्यवस्था सुरळीत करावी तसेच पाण्याचा निचरा व्यवस्थित होण्यासाठी लक्ष दिले पाहिजे. अन्यथा पावसाळ्यात आणखी परिस्थिती वाईट होण्याची शक्यताही कुतिन्हो यांनी व्यक्त केली आहे.
झाडे कोसळल्याने वाहतूक कोंडी
महामार्गावर झाडे कोसळून वाहतुकीची कोंडी झाली. अग्निशामक दलाने ही झाडे हटवून वाहतूक सुरळीत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. झाडे वीज वाहिन्यांवर पडल्याने विजेच्या तारा तुटून पडल्या. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज खात्याचे अभियंते व लाईनमन कार्यरत होते. धर्मापूर पंचायत परिसरात जाकनीबांध येथे झाड कोसळल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. सासष्टी तालुक्मयात अनेक ठिकाणी आंब्याची झाडे उन्मळून पडली. ती हटविण्याचे काम अग्निशामक दलाने हाती घेतले होते. खंडित झालेला वीजपुरवठा दुपार पर्यंत सुरळीत करण्यात वीज खात्याला यश आले.
स्टेशन रोड पाण्याखाली
मडगावचा स्टेशन रोड पहिल्याच पावसात पाण्याखाली गेला. गेल्या वर्षी देखील असाच प्रकार घडला होता. कुडचडेतील आंबेडकर सर्कलमधील रस्ते पाण्याखाली गेले. त्यामुळे वाहनचालकांची बरीच गैरसाय झाली. आंबेडकर सर्कलमध्ये पाण्याचा निचरा व्यवस्थित होतनसल्याने हे प्रकार घडू लागले आहेत. गेल्या वर्षीही असाच प्रकार घडला होता.
पाटकर यांची काब्राल यांच्यावर टीका
आंबेडकर सर्कलमधील रस्ते पहिल्याच पावसात पाण्याखाली गेल्याने प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी स्थानिक आमदार तथा सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांच्यावर टीका केली आहे. काब्राल हे आपल्याच मतदारसंघाची व्यवस्थित काळजी घेऊ शकत नाहीत. पहिल्याच पावसात ही परिस्थिती तर नंतर काय परिस्थिती होईल? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.