नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळल्याची घटना सोमवारी दुपारी समोर आली. या दुर्घटनेत 5 मजूर अडकल्यानंतर सायंकाळपर्यंत सर्वांना बाहेर काढण्यात यश आले होते. दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मदत ब बचावकार्य केले. ढिगाऱयातून बाहेर काढलेल्या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या दुर्घटनेला “अत्यंत दुःखद’’ असल्याचे म्हटले आहे. तसेच जखमींवर योग्यपणे उपचार करण्याची सूचना वैद्यकीय यंत्रणांना केल्याची माहितीही त्यांनी दिली.
दक्षिण दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात सोमवारी कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱयाखाली तीन तासांहून अधिक काळ अडकलेल्या पाच कामगारांना बचाव कर्मचाऱयांनी बाहेर काढले, असे दिल्ली अग्निशमन सेवेचे संचालक अतुल गर्ग यांनी सायंकाळी जाहीर केले. तीन मजली इमारतीचे नूतनीकरण सुरू असताना ही दुर्घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. ढिगाऱयाखाली अडकलेल्या पाचही मजुरांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच बचावकार्य संपल्याचेही अग्निशमन दलाकडून जाहीर करण्यात आले आहे.
सत्य निकेतन परिसरातील इमारत क्रमांक 173 मध्ये एक घर कोसळल्याचा कॉल दुपारी 1ः24 च्या सुमारास नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सला (एनडीआरएफ) प्राप्त झाला होता. त्यानंतर अग्निशमन दलाच्या सहा गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या. ही इमारत गजबजलेल्या भागात असल्याने बचाव वाहनांना आत नेण्याचे मुख्य आव्हान होते. मात्र, पोलिसांच्या मदतीने एनडीआरएफने पद्धतशीर नियोजन करत ढिगाऱयाखाली अडकलेल्या सर्व कामगारांना वाचविले आहे. एनडीआरएफच्या या कामगिरीचे परिसरातून कौतुक होत आहे.