दोन्ही प्रभाग महिलांसाठी राखीव : पालिकेला लाभणार दोन नवीन नगरसेवक
फोंडा : फोंडा नगरपालिकेच्या निवडणुकीत दुर्गाभाट प्रभाग 10 व पंडितवाडा प्रभाग 11 या दोन्ही प्रभागांमध्ये तिरंगी लढत होणार असून दोन्ही प्रभाग महिलांसाठी राखीव आहेत. विशेष म्हणजे दोन्ही प्रभागांतून नवीन चेहरे रिंगणात आहेत. दोन्ही प्रभाग आरक्षित झाल्याने काही आजी माजी नगरसेवकांचे पत्ते कट झाल्याने त्यांनी आपल्या कुटुंब सदस्यांना रिंगणात उतरविले आहे. दुर्गाभाट, वरचा बाजार प्रभाग 10 हा ओबीसी महिलांसाठी राखीव असल्याने याठिकाणी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक शांताराम कोलवेकर यांच्या पत्नी दीपा कोलवेकर या निवडणूक लढवित आहेत. भाजपा पुरस्कृत फोंडा नागरिक समिती पॅनलच्या त्या उमेदवार असून त्यांच्याविरोधात मगो रायझिंग फोंडा पॅनलच्या मनस्वी परेश मामलेदार या रिंगणात आहेत. याशिवाय अपक्ष उमेदवार पूजा कुश नाईक अशी तिघांमध्ये ही तिरंगी लढत होणार आहे. शांताराम कोलवेकर हे सलग दोनवेळा या प्रभागातून निवडून आले आहेत. मगो व भाजपा उमेदवारांमध्ये याठिकाणी अटीतटीची लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते. पंडितवाडा प्रभाग 11 महिलांसाठी राखीव आहे. मागील निवडणुकीत नगराध्यक्ष रितेश नाईक हे या प्रभागातून निवडून आले होते. हा प्रभाग आरक्षीत झाल्याने ओबीसीसाठी राखीव असलेल्या दाग खडपाबांध प्रभाग 5 मधून ते उमेदवारी करीत आहेत. या प्रभागातून भाजपा पुरस्कृत फोंडा नागरिक समिती पॅनलमधून कु. प्रियांका नवनाथ शेट पारकर, मगो रायझिंग फोंडा पॅनलतर्फे सौ. वेदिका विवेकानंद वळवईकर तर काँग्रेस समर्थक उमेदवार म्हणून माजी नगराध्यक्ष शैलेंद्र शिंक्रे यांची मुलगी कु. शुभलक्ष्मी शैलेंद्र शिंक्रे या रिंगणात आहेत. तिनही उमेदवार नवीन चेहरे असले तरी भाजपा, मगो व काँग्रेस अशा तिनही प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंगणात असल्याने राजकीय वर्चस्वाच्या दृष्टीने ही लढत प्रतिष्ठेची ठरणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही प्रभागांतून फोंडा पालिकेला नवीन नगरसेवक लाभणार आहेत.