कोणतीही नित्योपयोगी वस्तू केवळ 1 रुपयात मिळेल, असे आपल्याला कोणी सांगितले तर आपला कदापीही विश्वास न बसणे स्वाभाविक आहे. पण अशी एक अनोखी योजना चंदीगढ महानगरपालिकेने तयार केली आहे. ‘मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर’ या नावाने ती योजना क्रियान्वित करण्यात आली आहे. पण अवघ्या 1 रुपयाला कोणतीही वस्तू मिळेल तरी कशी, हा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही.
तर ही योजना अशी आहे, की ती केवळ गोरगरीबांसाठीच आहे. तसेच या योजनेअंतर्गत ज्या वस्तू मिळणार आहेत, त्या शहरातील सर्वसामान्यांकडूनच घेण्यात येणार आहेत. आपल्या घरात अशा अनेक वस्तू असतात की ज्या आपण कधीच उपयोगात आणत नाही. त्या वस्तू चांगल्या स्थितीत असतात पण पडून असतात. आपल्या चपला, बूट, पुस्तके, नव्या घेतल्यानंतर पडून राहिलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, पिशव्या, बॅगा, जुने फर्निचर, अभ्रे, उशा, गाद्या, पलंगपोस, विविध प्रकारचे कपडे इत्यादी अनेक वस्तू अशा असू शकतात. ज्या घरात आहेत हेच कित्येकदा आपण विसरुन जात असतो. तर अशा वस्तू महापालिका स्वत:च्या खर्चाने एकत्र करणार आहे. त्यांच्यापैकी ज्या वस्तू पुन्हा उपयोग करण्याजोग्या आहेत, त्यांची विक्री महापालिकेच्या दुकानातून प्रत्येक वस्तूमागे 1 रुपया या दराने केली जाणार आहे. नुकतेच या दुकानाचे उद्घाटन चंदीगढच्या महापौरांच्या हस्ते झाले आहे. आपण स्वत:ही या वस्तू या दुकानात जाऊन देऊ शकता.
ज्या वस्तू खराब झालेल्या असतील, त्यांची दुरुस्ती करुन त्या उपयोग करण्यायोग्य स्वरुपात आणून त्यांची विक्री केली जाईल. या दुकानाचा लाभ शहरातील अतिशय गरीब लोकांना होणार आहे. त्यांना चांगल्या वस्तू अतिशय स्वस्तात मिळणार आहेत. ही योजना जनतेच्या सहकार्यावरच पूर्णत: अवलंबून राहणार आहे. त्यामुळे सहकार्याचे आवाहन तेथील महापौरांनी केले आहे. तेथे ही योजना यशस्वी झाल्यास अन्यत्रही तिची पुनरावृत्ती होणे शक्य आहे.