कुत्र्यांना कोणाचीही चप्पल चावण्याचा आणि फाडण्याचा नाद असतो, हे आपल्याला माहीत आहे. आपण आपल्या चपला घराबाहेर काढल्या असतील आणि त्या कुत्र्यांच्या तावडीत सापडल्या की त्यांची वाट लागतेच. काही लोकही असे असतात, की जे मुद्दाम चपला कुत्र्याला चावण्यासाठी देतात. पण बहुतेकांना कुत्र्यांच्या या सवयीचा त्रास होतो. अनेकदा नव्या चपला खरेदी कराव्या लागतात.
या समस्येतून लोकांची सुटका करण्यासाठी एका कंपनीने चावली न जाणारी चप्पल तयार केली आहे. कुत्र्याने ती तोंडात धरली तर त्याला उलटी होण्याची भावना होईल आणि ते चपलेला नाद सोडून देईल अशी व्यवस्था या चपलेत करण्यात आली आहे. माणसाला मात्र ही चप्पल कोणत्याही कारणास्तव धोकादायक ठरणार नाही, याची दक्षता बाळगण्यात आली आहे.
ब्राझीलच्या ब्रिझा या कंपनीने ही चप्पल आता उपलब्ध केली आहे. याकामी या कंपनीला पिडीग्री आणि मिरुम या ब्राझीलमधील कंपन्यांनी साहाय्य केले आहे. अशा प्रकारची चावली न जाणारी चप्पल जगाच्या इतिहासात प्रथमच निर्माण करण्यात आली आहे, असे प्रतिपादन या कंपनीने केले आहे. ही चप्पल उपयोग करण्यासाठी इतर कोणत्याही चपलेसारखीच आहे. मात्र, ती अत्यंत कडू पदार्थांपासून बनविण्यात आल्याने कुत्र्याने ती तोंडात धरली की त्याला अस्वस्थ वाटणार आहे आणि त्वरित तो ती सोडून देणार आहे, असे या कंपनीचे म्हणणे आहे. गेल्या एप्रिल महिन्यात तिच्या उत्पादनाची घोषणा करण्यात आली होती. येत्या काही महिन्यात आणखी काही परिक्षणे झाल्यानंतर ती उपलब्ध होत आहे. डेनाटोनियम बेंझोएट या रासायनिक पदार्थाचा उपयोग करण्यात आला आहे.