वृत्तसंस्था/ मुंबई
विदेशी चलन साठ्याच्या कामगिरीत पुन्हा निराशा दिसली आहे. गेल्या दोन आठवड्यात मिळून देशाच्या विदेशी चलन साठ्यात एकूण 5.9 अब्ज डॉलर्सची घसरण झाली असल्याची माहिती आहे. 22 सप्टेंबरला संपलेल्या आठवड्यात विदेशी चलन साठा 590.70 अब्ज डॉलर्सवर घसरला, जो चार महिन्याच्या नीचांकी स्तरावर कार्यरत होता. भारतीय रिझर्व्ह बँपेने यासंदर्भातील माहिती जारी केली आहे.
मागच्या आठवड्यात यात पुन्हा 2.3 अब्ज डॉलर्सची घसरण अनुभवायला मिळाली आहे. गेल्या दोन आठवड्यात एकूण घसरण 5.9 अब्ज डॉलर्स इतकी दिसून आली आहे. याआधी ऑक्टोबर 2021 मध्ये देशातील विदेशी चलन साठा 645 अब्ज डॉलर्स इतक्या सर्वकालीक उच्चांकावर पोहचला होता. जागतिक परिस्थितीमुळे त्यावेळी चलन साठ्यात वाढ नोंदवली गेली होती. पण आता परिस्थिती वेगळी आहे.
का घटला साठा
डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनीमय दरात घसरण थांबायचे नाव घेईना म्हटल्यावर याच चलन साठ्याचा वापर रिझर्व्ह बँकेने केला होता. त्यामुळे याचा परिणाम विदेशी चलन साठ्यावर दिसून आला. डॉलरच्या तुलनेत रुपया विक्रमी पातळीवर घसरत असून ही घसरण कमी करण्यासाठी मागच्या काही व्यवसाय सत्रात सरकारी बँकांच्या मार्फत डॉलरच्या विक्रीवर भर दिला जात होता, असे कळते.