वृत्तसंस्था/ मुंबई
15 सप्टेंबरला संपलेल्या आठवड्यामध्ये देशातील विदेशी चलन साठ्यामध्ये 86.7 कोटी डॉलर्सची घसरण दिसून आली आहे. या घसरणीनंतर विदेशी चलन साठा 593.037 अब्ज डॉलरवर राहिला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने या संदर्भातली माहिती नुकतीच दिली आहे.
गेल्या चार महिन्यांचा चलन साठ्याचा विचार करता ही याखेपेची घसरण नीचांकी असल्याचे सांगितले जात आहे. 8 सप्टेंबरला संपलेल्या आठवड्यामध्ये देशातील विदेशी चलन साठा 4.99 अब्ज डॉलरने घटून 593.90 अब्ज डॉलरवर राहिला होता. याआधी 2021 च्या ऑक्टोबरमध्ये देशातील विदेशी चलन साठा 645.5 अब्ज अमेरिकन डॉलरवर म्हणजे सर्वकालिक उच्चांकावर पोहोचला होता.
जागतिक दबावाचा परिणाम
मागच्या वर्षी जागतिक स्तरावर असणारी गोंधळाची परिस्थिती यामुळे विदेशी चलन साठ्यावर परिणाम दिसून आला आहे. रिझर्व्ह बँकेने जागतिक दबावाच्या अंतर्गत रुपयाच्या विनिमय दरामध्ये होणारी घसरण थांबवण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे याचा विदेशी चलन साठ्यावर काहीसा परिणाम जाणवला आहे. सुवर्ण साठ्याचे मूल्य याच दरम्यान 38.4 कोटी डॉलरने घटून 44 अब्ज डॉलरवर राहिले आहे.