भीम सिंह यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन
वृत्तसंस्था/ जम्मू
जम्मू-काश्मीर नॅशनल पँथर्स पार्टीचे संस्थापक आणि वरिष्ठ नेते प्राध्यापक भीम सिंह यांचे मंगळवारी सकाळी वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी जम्मूच्या बक्षी नगर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. भीम सिंह मागील काही काळापासून आजारी होते.
नॅशनल पँथर्स पार्टी जम्मू-काश्मीरमधील एक राजकीय पक्ष आहे. याची स्थापना 23 मार्च 1982 रोजी भीम सिंह आणि त्या काळातील काही तरुण राजकीय नेत्यांनी केली होती. भीम सिंह हे 30 वर्षापर्यंत या पक्षाचे अध्यक्ष राहिले. 2012 मध्ये त्यांनी स्वतःचा पुतण्या हर्षदेव सिंह याच्याकडे पक्षाची धुरा सोपविली होती. भीम सिंह यांनी मागील वर्षी सक्रीय राजकारणात पुन्हा पुनरागमन केले होते.
जम्मू-काश्मीरचे पहिले मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांच्या विरोधात बोलल्याप्रकरणी भीम सिंह यांना 1978 मध्ये श्रीनगरच्या मध्यवर्ती तुरुंगात कैद रहावे लागले होते. या तुरुंगात त्यांच्या हत्येचाही प्रयत्न झाला होता.
कलम 370 चे विरोधक
भीम सिंह राजकारणी असण्यासह कार्यकर्ते, वकील आणि लेखक देखील होते. चेनानी-घोर्डी (उधमपूर) मतदारसंघातून ते जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत 1977-87 पर्यंत ते कार्यरत होते. 1991-2016 पर्यंत पंतप्रधानांकडून राष्ट्रीय एकता परिषदेचे सदस्य म्हणून त्यांची सातत्याने निवड होत राहिली होती. 2002 साली जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वात पँथर्स पार्टीने उधमपूर जिल्हय़ातील सर्व जागांवर विजय मिळविला होता. भीम सिंह यांनी कलम 370 आणि 35-अ रद्द करण्याची मागणी लावून धरली होती.
150 देशांचा दौरा
भीम सिंह यांनी ‘अनबिलिव्हेबल-दिल्ली टू इस्लामाबाद’ हे पुस्तक लिहिले होते. भारतीय आणि पाकिस्तानी तुरुंगातून 700 हून अधिक कैद्यांच्या मुक्ततेसाठी केलेल्या प्रयत्नांचा त्यांनी पुस्तकात उल्लेख केला होता. भीम सिंह 150 देशांचा दौरा करणारे पहिले भारतीय होते.