ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुणे महानगर परिवहन महामंडळाने खास महिलांसाठी सुरू केलेल्या ‘तेजस्विनी’ बसमधून महिलांना आता प्रत्येक महिन्याच्या 8 तारखेला मोफत प्रवास करता येणार आहे. जागतिक महिला दिनापासून म्हणजेच 8 मार्चपासून या उपक्रमाला सुरूवात होणार आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त मार्च 2019 मध्ये प्रत्येक महिन्याच्या आठ तारखेला तेजस्विनी बसमधून महिलांसाठी मोफत प्रवास सुरू करण्याचा निर्णय पीएमपीएमएलने घेतला होता. या निर्णयाला पीएमपी संचालक मंडळाची मान्यता मिळाली होती. त्यानुसार पीएमपीकडून खास महिलांसाठी 23 मार्गांवर 28 तेजस्विनी बस सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाकाळातील अल्प प्रतिसादामुळे बस बंद करण्यात आल्या होत्या. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पीएमपीएमएलने सर्व मार्गांवर पूर्ण क्षमतेने बस सुरू केल्या आहेत. त्यानुसार तेजस्विनी बसदेखील नोव्हेंबर 2022 पासून सुरू करण्यात आल्या आहेत.
सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागात महिलांसाठी 19 मार्गांवर 24 तेजस्विनी बस सुरू आहेत. स्वारगेट, हडपसर, कात्रज, विश्रांतवाडी, निगडी, आकुर्डी, चिंचवड, अप्पा बळवंत चौक, पुणे महानगरपालिका अशा अनेक मार्गावर तेजस्विनी बस सुरू आहे.
अधिक वाचा : बीजसोहळ्यानिमित्त देहूत हरीनामाचा गजर