इस्लामपूर शहरात गुन्हेगारीतील वर्चस्ववाद आणि टोळीयुद्धातून रात्री ११ च्या सुमारास बहे रस्त्यावरील रिंग रोडवर २७ वर्षीय गुंडाचा डोक्यात, चेहऱ्यावर धारदार हत्याराने वार करत आणि दगड घालून खून करण्यात आल्याची घटना घडली. बारमध्ये झालेल्या वादावादीनंतर बाहेर पडल्यावर या गुंडाचा खून करण्यात आला.
प्रकाश महादेव पुजारी (२७,रा.औद्योगिक वसाहत, दूध संघाच्या पाठीमागे, इस्लामपूर) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुंड आहे. त्याच्याविरुद्ध खंडणी आणि गंभीर शारीरिक दुखापत करण्याच्या गुन्ह्यांची नोंद आहे. यातील हल्लेखोर हे मोक्का कारवाईतून जामीनावर बाहेर आल्याची चर्चा आहे. तसेच हा खून वर्चस्ववादातून घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
प्रकाश उर्फ पक्या पुजारी या नावाने खून झालेला गुंड गुन्हेगारी वर्तुळात परिचित होता. मंगळवारी रात्री तो बहे रस्त्यावरील एका बारमध्ये बसला होता. त्यावेळी संशयीत हल्लेखोरही त्याच बारमध्ये आले होते. तेथे त्यांच्यात वादावादी झाली. तेथून बाहेर बसल्यावर रस्त्याकडेच्या अंधारात त्यांच्यामध्ये बाचाबाची सुरू झाली. त्यातून हल्लेखोरांनी धारदार हत्याराने त्याच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर वार केले. त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून पोबारा केला.