राज्यसभेवर जाण्याची चर्चा फेटाळली : राजकारणात रस नसल्याचे स्पष्टीकरण
वृत्तसंस्था / अहमदाबाद
गौतम अदानी यांना राज्यसभेवर पाठविले जाणार असल्याच्या वृत्तांवर अदानी समुहाने स्पष्टीकरण दिले आहे. अदानी कुटुंबाला राजकारणात रस नसल्याचे वक्तव्य शनिवारी रात्री उशिरा प्रसिद्ध करण्यात आले. राज्यसभा निवडणुकीची घोषणा होताच अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी किंवा त्यांच्या पत्नी प्रीति अदानी यांना एखाद्या राजकीय पक्षाकडून राज्यसभेवर पाठविले जाणार असल्याचा दावा काही प्रसारमाध्यमांकडून करण्यात आला होता. याचमुळे अदानी समुहाला यासंबंधी स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.
राज्यसभेवर जाण्यासंबंधीचे वृत्त खोटे आहे. काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी आमच्या नावांचा वापर करत आहेत. गौतम अदानी, प्रीति अदानी आणि अदानी परिवारातील कुठल्याही सदस्याला राजकीय पक्षात सामील होण्याचे स्वारस्य नसल्याचे समुहाकडून म्हटले गेले आहे.
जूनमध्ये रिक्त होणाऱया आंध्रप्रदेशसाठीच्या 4 राज्यसभा जागांकरता लॉबिंग गतिमान झाले आहे. 21 जून रोजी व्ही. विजयसाई रेड्डी, टी.डी वेंकटेश, वाय.एस. चौधरी आणि सुरेश प्रभू हे निवृत्त होणार आहेत. या जागांकरता 6 नावे आघाडीवर असून यात अदानी कुटुंबातील सदस्य सामील असल्याचा दावा काही प्रसारमाध्यमांनी केला होता.
15 राज्यांसाठीच्या राज्यसभेच्या 57 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होणार आहे. या सर्व जागांवरील खासदारांचा कार्यकाळ जून ते ऑगस्टदरम्यान पूर्ण होत आहे. भाजपची नजर राज्यसभेत बहुमत प्राप्त करण्यावर आहे. 245 जागांपैकी भाजपकडे 101 जागा आहेत. निवडणुकीनंतर ही संख्या आणखीन वाढणार आहे.