ऑस्ट्रेलियाला पराभूत करून नेदरलँडस् संघाला कास्यपदक
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या रविवारी येथे झालेल्या पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात जर्मनीने विद्यमान विजेत्या बेल्जियमचा सडन डेथमध्ये 5-4 अशा गोलफरकाने पराभव करत अजिंक्यपद पटकावले. जर्मनीचे या स्पर्धेच्या इतिहासातील हे तिसरे अजिंक्यपद आहे. जर्मनीच्या निकलास वेलेनला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. सदर स्पर्धेतील तिसऱया स्थानासाठी झालेल्या सामन्यात नेदरलँडसने बलाढय़ ऑस्ट्रेलियाचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव करून कास्यपदक पटकावले.
आंतरराष्ट्री हॉकी फेडरेशनच्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत जर्मनीने यापूर्वी दोनवेळा विजेतेपद मिळवले होते. 2023 च्या या स्पर्धेत त्यांनी तिसऱयांदा अजिंक्यपद मिळवून नेदरलँडस्, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. नेदरलँडस्, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांनी आतापर्यंत ही स्पर्धा तीनवेळा जिंकली होती.
जर्मनी आणि विद्यमान विजेता बेल्जियम यांच्यातील सामना अपेक्षेप्रमाणे चुरशीचा झाला. निर्धारित वेळेत तसेच त्यानंतर पेनल्टी शुटआऊटपर्यंत दोन्ही संघांनी 3-3 अशी बरोबरी साधली होती. पंचांनी यानंतर सडनडेथचा अवलंब केला. सडनडेथमध्ये जर्मनीच्या पहिल्या फटक्यावर निकलास वेलेनने गोल नोंदवला. जर्मनीचा हा चौथा गोल ठरला. त्यानंतर बेल्जियमतर्फे वेगनेझने पहिल्या फटक्यावर आपल्या संघाचा चौथा गोल नोंदवला. सडनडेथमधील दुसऱया फटक्यावर जर्मनीच्या प्रिन्झने गोल केला. मात्र बेल्जियमच्या कॉसनिसला सडनडेथमधील दुसऱया फटक्यावर गोल नोंदवता न आल्याने जर्मनीने हा सामना 5-4 अशा गोलफरकाने जिंकला.
नेदरलँडस्ला कास्य
रविवारी या स्पर्धेतील तिसऱया स्थानासाठी (कास्यपदक) झालेल्या सामन्यात नेदरलँडस्ने ऑस्ट्रेलियाचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला. नेदरलँडस्ने यापूर्वी या स्पर्धेचे दोनवेळा ऑस्ट्रेलियाने तीनवेळा अजिंक्यपद मिळवले होते. ऑस्ट्रेलियाला 2023 च्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
या सामन्यात पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत ऑस्ट्रेलियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. ऑस्ट्रेलियाकडून 200 व्या सामन्यात खेळणाऱया जेरेमी हेवर्डने 12 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर संघाचे खाते ऑस्ट्रेलियाला 14 व्या मिनिटाला आणखी पेनल्टी कॉर्नर मिळाला पण हॉलंडच्या गोलरक्षकाने तो थोपवला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सत्राअखेर नेदरलँडस्वर 1-0 अशी आघाडी घेतली होती. नेदरलँडस्च्या पृणला पंचांनी हिरवे कार्ड दाखवल्याने नेदरलँडस्ला दोन मिनिटांच्या कालावधीसाठी एका खेळाडूच्या कमतरतेने खेळावे लागले. 21 व्या मिनिटाला नेदरलँडस्ला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण त्याचा त्यांना लाभ घेता आला नाही. ऑस्ट्रेलियाच्या टीम ब्रँडला पंचांनी 22 व्या मिनिटाला हिरवे कार्ड दाखवून दोन मिनिटासाठी बाहेर काढले. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी नेदरलँडस्वर मिळवली होती.
31 व्या मिनिटाला नेदरलँडस्ला आणखी पेनल्टी कॉर्नर मिळाला पण तो वाया गेला. 32 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर जीपने नेदरलँडस्ला बरोबरी साधून दिली. नेदरलँडस् संघातील थियेरी ब्रिंकमन 34 व्या आणि 39 व्या मिनिटाला असे दोन गोल नोंदवून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात 53 व्या आणि 59 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नर्सचा नेदरलँडस्ला लाभ उठवता आला नाही. अखेर नेदरलँडस्ने ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात आणत कास्यपदकावर आपले नाव कोरले.