प्रतिनिधी / पणजी
गोवा राज्य आता नामवंत असे आध्यत्मिक पर्यटनस्थळ बनविण्याचा बेत आखण्यात आला असून महिन्याभरात त्याची सविस्तर घोषणा होणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली आहे.
पर्यटन उच्चाधिकार समितीची बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. योग, वेलनेस पर्यटनावर भर देऊन आध्यात्मिक पर्यटन पुढे नेण्याचा इरादा त्यांनी व्यक्त केला. गोव्यातील सुप्रसिद्ध महत्त्वाची मंदिरे पर्यटनांतर्गत एकमेकांना जोडण्यात येणार असून किनारपट्टी सोडून इतर पर्यटनस्थळांचा विकास होणे गरजेचे आहे. गोवा हे आध्यात्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध होऊ शकते आणि त्या क्षेत्रातही पर्यटन वाढणे आवश्यक आहे, असे खंवटे यांनी नमूद केले.
फर्मागुढीत वारसा संग्रहालय
यंदा शिवजयंती उत्सव मोठा धुमधडाक्यात साजरा करण्यात येणार असून त्याचे कार्यक्रम राज्यातील सर्व प्रमुख शहरात आखण्यात येणार आहेत. फर्मागुढीचा किल्ला विकसित करून तो अधिक सुंदर व रमणीय करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच तेथे ऐतिहासिक वारसा जपणारे संग्रहालय उभे राहणार असल्याची माहितीही खंवटे यांनी दिली.
राममंदिरनिमित्त कार्यक्रम
आझादी का अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने राज्यात युवा 75 क्लबची स्थापना होणार असून हे क्लब राज्यात विविध कार्यक्रम सादर करतील. अयोध्येत 23 जानेवारी 2024 रोजी राममंदिराच्या तळमजल्याचे उद्घाटन करण्यात येणार असून त्या अनुषंगाने गोव्यात विविध कार्यक्रम होतील. त्याचा फायदा घेऊन राज्याचे पर्यटक आणखी वाढणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.