मान्यवरांनी वाहिली आदरांजली : मडगावातील रस्त्याला त्यांचे नाव देण्याची मागणी
मडगाव : स्व. गोकुळदास शिरोडकर यांनी आपल्या आयुष्यात अनेक माणसे जोडली. त्यांनी माणसे तोंडण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. एखादी गोष्ट त्यांच्या मनाला पटली नाही तर ते स्व:ताहून बाजूला रहात होते. चांगल्या उपक्रमांना त्यांचा सदोदीत पाठिंबा असायचा. अनेकांना त्यांचे मार्गदर्शन लाभायचे. समाजकारण, राजकारण, क्रीडा क्षेत्र व कलेच्या क्षेत्रात त्यांनी स्वताचा असा ठसा उमठविला होता. ते खत्या अर्थाने अष्टपैलू व्यक्तिमत्व होते अशा शब्दात काल मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. आदरांजलीच्या कार्यक्रमाला मडगावचे आमदार दिगंबर कामत, मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, उपनगराध्यक्ष दिपाली सावळ, नगरसेवक सदानंद नाईक, राजू नाईक, कामिलो बार्रेटो, बबिता नाईक, उद्योजक दत्ता नायक, माजी आमदार धर्मा चोडणकर, बार्देश बाझारचे अध्यक्ष निखिल खलप, गोमंत विद्या निकेतनचे अध्यक्ष जनार्दन वेर्लेकर, सुनील नाईक, गिरीश चोडणकर, प्रशांत नाईक, उद्योजक आदेश कारवारकर, विश्वनाथ स्वार, रोहिदास नाईक तसेच इतरांची उपस्थिती होती. यावेळी स्व. गोकुळदास शिरोडकर यांच्या पत्नी श्रीमती अनुया शिरोडकर, पूत्र-स्नुषा, कन्या व जावई उपस्थित होते. गोकुळदास शिरोडकर हे सर्वांना सोबत घेऊन जात असे, सर्वांशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यांनी माणसे जोडली, माणसे तोंडली नाही हा त्यांचा चांगला गुण होता. ज्या क्षेत्रात त्यांनी काम केले, त्या ठिकाणी त्यांनी माणसे जोडली. अशा प्रकारले आपला एक ठसा त्यांनी समाजावर उमठविला. देशी खेळांना विशेष करून कब्बडी व खो-खो खेळाला त्यांनी सुरवातीच्या काळात प्रोत्साहन दिले होत. ते एक उत्कृष्ट आयोजक होते. गेली अनेक वर्षे आपल्याशी त्यांचा जवळचा संबंध होता असे दिगंबर कामत यावेळी म्हणाले.
त्यांचे कार्य पुढे नेणे महत्वाचे
गोकुळदास शिरोडकर यांनी विविध क्षेत्रात योगदान दिले. त्यांचे हे कार्य पुढे नेणे महत्वाचे असल्याचे माजी आमदार धर्मा चोडणकर म्हणाले. बार्देश बाझारचे कार्य क्षेत्र वाढावे अशी त्यांची इच्छा होती. त्या प्रमाणे मडगावात बार्देश बाझार सुरू झाला. त्यासाठी त्यांनी दिलेले योगदान खुपच महत्वाचे होते. बार्देश बाझारच्या संचालक मंडळाला त्यांच्याकडून नेहमीच सहकार्य व मार्गदर्शन मिळाले. आपली त्यांच्याशी घनिष्ठ मैत्री होती. त्यामुळे एखादी समस्या निर्माण झाली तर त्यांचे मार्गदर्शन घेतले जात असे. त्यांच्या सानिध्यात आलेल्या सर्वांना मायेचा आधार मिळत होता. अनेक नेतृत्वे त्यांनी उभी केली असे श्री. चोडणकर म्हणाले.
इतरांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले
मडगाव नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 7 मधून गोकुळदास शिरोडकर हे निवडून आले. त्यानंतर ते उपनगराध्यक्ष झाले. मडगाव पालिका क्षेत्रासाठी त्यांनी योगदान दिले. खेळात असो किंवा सांस्कृतिक क्षेत्रात असो त्यांनी इतरांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच आपण पालिका निवडणुकीत उतरलो व नगरसेवक झालो. आज नगराध्यक्ष आहे. आपण इथे पर्यंत मजल गाठणार याचा स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता असे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर म्हणाले.
गोकुळदास अजात शत्रू होते
गोकुळदास शिरोडकर यांच्या चेहऱ्यावर नेहमीच हास्य असायचे. ते कधीच वैफल्यग्रस्त वाटले नाही. ते अजात शत्रू होते. त्यांचे कुणाचकडे शत्रूत्व नव्हते. कधी मतभेद झालेच तर अवघ्याच शब्दांनी कानात बोलायचे. आपल्याला असे वाटत आहे तसे तुम्ही करावे म्हणायचे. एखादे काम सांगितले आणि ते झाले की, ते मुद्दामहून भेटायला यायचे व कृतज्ञा व्यक्त करायचे. आज ही भावना समाजात दृष्टीस पडत नाही. त्यांनी नीस्वार्थी भावनेने काम केले. भविष्यात अशा प्रकारचे कार्यकर्ते भेटणे कठीण होईल असे दत्ता नायक म्हणाले.
रस्त्याला नाव द्या
गोकुळदास शिरोडकर यांच्या स्मृती कायम ठेवण्यासाठी मडगाव पालिका क्षेत्रातील एखाद्या रस्त्याला त्यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी प्रशांत नाईक यांनी केली. त्यांचे कार्य हे सर्वांसाठी प्रेरणादायी होते. आपण काणकोणहून मडगावात आलो तेव्हा सुरवातीच्या काळात कुणाचा विशेष असा आधार नव्हता. पण, जेव्हा गोकुळदास शिरोडकर यांच्याशी गाठभेट झाली, तेव्हा त्यांनी आधार दिला. मार्गदर्शन केले. विद्यार्थी चळवळीला प्रोत्साहन दिले असे श्री. नाईक म्हणाले. यावेळी जनार्दन वेर्लेकर, गिरीश चोडणकर, प्रदीप नाईक, विश्वनाथ स्वार, सावियो कुतिन्हो, रोहिदास नाईक, कन्या अमिशा पेडणेकर इत्यादींनी स्व. गोकुळदास शिरोडकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला. सूत्रसंचालन नवनाथ खांडेपारकर यांनी केले तर शेवटी पूत्र अमेय शिरोडकर यांनी आभार मानले.