म्हापसा अग्निशामक दलाचे श्रीकृष्ण पर्रीकर यांचा विश्वास
म्हापसा : पावसाळ्यात आपत्कालीन सेवेसाठी आम्ही सर्वोतोपरी सज्ज आहोत. यंदा आमच्याकडे पाहिजे तेवढा मनुष्यबळ असून म्हापसा पालिकेकडेही अतिरिक्त कामगार मागितले असल्याची माहिती नव्यानेच ताबा घेतलेले म्हापसा अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीकृष्ण पर्रीकर यांनी दैनिक तरुण भारतशी बोलताना दिली. आम्ही पावसाळ्यातच सज्ज असतो असे नाही तर इतरही काळात आमची यंत्रणा सज्ज असते. आम्ही झाडे कापण्याचे कटर, वाहने तैनात ठेवली आहेत. कालच आपण म्हापशाचा ताबा घेतला असून पिळर्णचा अतिरिक्त ताबाही आपल्याकडे आहे. म्हापसा पालिकेसह पिळर्ण पंचायतीचाही आम्हाला पाठिंबा मिळणार आहे. सध्या आमच्याकडे कर्मचाऱ्यांची तसेच यंत्रसामुग्रीचीही कमतरता नाही. एकाच वेळी आपत्कालीन घटना घडल्यास आम्हाला धावपळ करावी लागते. मात्र तरीही आम्ही सर्व काही व्यवस्थित सांभाळत असल्याचे यावेळी पर्रीकर यांनी सांगितले.
आपत्कालीनसाठी 101 वर फोन करा
आमच्याकडे गाड्यांची कमतरता नसून म्हापशात तीन गाड्या आहेत. पावसाळ्यात झाडे पडून वीजपुरवठा खंडित झालेल्या ठिकाणी आम्ही प्रथम धाव घेतो. आपत्कालीन घटना घडल्यास नागरिकांनी 101 क्रमांकावर फोन करून घटनेची माहिती द्यावी, असेही पर्रीकर म्हणाले.