पत्रकार परिषदेत दिली माहिती
प्रतिनिधी/ बेळगाव
राज्यातील ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना कोणत्याही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. मागील अनेक वर्षांपासून हे कर्मचारी सेवा बजावत असताना राज्य सरकारने त्यांना सुविधा पुरविलेल्या नसल्याने बेळगावमध्ये होणाऱ्या अधिवेशन काळात सरकारविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. कर्नाटक राज्य ग्रामपंचायत कर्मचारी विकास संघटनेच्या वतीने सोमवार दि. 19 रोजी सुवर्णसौधसमोर भव्य आंदोलन केले जाणार असल्याची माहिती शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
ग्राम पंचायतींमध्ये बिल कलेक्टर, वॉटरमन, बीईओ, डेटा एन्ट्री ऑपरेटर, सफाई कर्मचारी, पंपचालक यांना भविष्यानिर्वाह निधी शिवाय आरोग्य सुविधा, वेतनश्रेणी सेवानिवृत्ती, नोकरीमध्ये कायम करणे यापासुन वंचित ठेवण्यात आले आहे. ग्राम विकास व पंचायत राज विभागाकडून या कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. रात्रंदिवस काम करणारे कर्मचारी सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे सोमवार दि. 19 रोजी काम बंद आंदोलन करून कर्मचारी या आंदोलनात सहभागी होतील्। अशी माहिती संघटनेचे प्रमुख डॉ. देवीप्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी जाहीर करावी, पदांची संख्या वाढवावी, पात्रता व वयोमर्यादेत वाढ करावी, सेवानिवृत्तीचा भत्ता द्यावा, आरोग्य सुविधा पुरवाव्यात यासह इतर मागण्या संघटनेकडून करण्यात आल्या आहेत.