प्रतिनिधी /बेळगाव
गुलमोहर बागतर्फे ‘प्रयास’ हे चित्रप्रदर्शन टिळकवाडी येथील के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरी (वरेरकर नाट्या संघ) येथे भरविण्यात आले आहे. विविध माध्यमांमधून 32 हून अधिक चित्रांचा प्रदर्शनात समावेश आहे. बेळगावमधील चित्रकारांनी आपल्या कल्पनेतून रेखाटलेली सुंदर चित्रे या ठिकाणी पाहता येतात.
प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी सकाळी मान्यवरांच्या हस्ते पार पडले. कोल्हापूर येथील चित्रकार पार्श्वनाथ नांद्रे, पुणे येथील चित्रकार शरद तरडे, बेंगळूर येथील चित्रकार जयंत हुबळी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. प्रदर्शनात वॉटर कलर, अक्रॅलिक, ऑईल कलर, क्लॉथ कोलाज, अक्रॅलिक ऑन कॅनव्हास, थ्रीडी प्रिंटिंग यांचा समावेश आहे.
दुपारच्या सत्रात उपस्थित मान्यवरांनी बेळगावमधील चित्रकारांना मार्गदर्शन केले. चित्र काढताना कशी काळजी घ्यावी, कोणते बारकावे असावेत याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. समिक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. 26 जानेवारीपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहेत.
प्रदर्शनात मान्यवरांची चित्रे
या प्रदर्शनामध्ये अजित हालमनी, आशा राणे, सी. ए. रांगणेकर, जी. एम. बेलगली, जे. डी. सुतार, ज्योति शर्मा, महेश होनुले, पद्मा श्रीनिवास, प्रवीणकुमार अंगडी, प्रिया फडके, ऋणाली वेर्णेकर, शिल्पा खडकभावी, शिवाजी बेकवाडकर, स्मिता नाडकर्णी, सुजाता वस्त्रद, सुषमा पाटणकर, वसंत एल., अंजली पवार, सी. करगावकर, गीतांजली हलगेकर, हेमांगी प्रभू, ज्योती साई, कल्पना कुलकर्णी, नंदा पाटील, पूजा जाधव, प्रिती पावटे, रोहितराज पाटील, सचिन उपाध्ये, शिरीष देशपांडे, शौरिका गरगट्टी, स्नेहा करगावकर, सुरेंद्र पाटणेकर, वाणी हिरेमठ, ऋषाली मराठे यांच्या चित्रांचा समावेश आहे.