अण्णाद्रमुक नेतृत्वाचा मुद्दा ः जैसे थे स्थिती ठेवण्याचा आदेश
वृत्तसंस्था/ चेन्नई
मद्रास उच्च न्यायालयाने अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कडगम (अण्णाद्रमुक)च्या 11 जुलै रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण बैठकीशी संबंधित प्रकरणात पक्षाचे अंतरिम महासचिव के. पलानिसामी यांना झटका देत 23 जून रोजीची जैसे थे स्थिती कायम ठेवण्याचा बुधवारी आदेश दिला.
तामिळनाडूतील मुख्य विरोधी पक्ष अण्णाद्रमुकच्या सर्वसाधारण बैठकीत ओ. पन्नीरसेल्वम आणि त्यांच्या काही सहकाऱयांना पक्षातून हाकलण्यात आले होते आणि पलानिसामी यांना अंतरिम महासचिव करण्यात आले होते. न्यायाधीश जी. जयचंद्रन यांनी बुधवारी दिलेल्या आदेशात 11 जुलैची बैठक बेकायदेशीर ठरविण्यात आली आहे.
समन्वयक आणि संयुक्त समन्वयकच सर्वसाधारण बैठक बोलावू शकतात. बैठक आयोजित करण्यासाठी एक पर्यवेक्षकाच्या नियुक्तीची सूचना न्यायाधीश जयचंद्रन यांनी केली आहे. ओ. पन्नीरसेल्वम आणि पक्षाच्या कार्यकारिणीचे सदस्य वैरामुथु यांच्याकडून दाखल याचिकांवर बुधवारी हा आदेश दिला ओ. समन्वयक आणि संयुक्त समन्वयक ही पदे समाप्त झालेली नाहीत असे न्यायालयाने स्पष्ट केल्याचा दावा पन्नीरसेल्वम यांच्या वकिलाने केला आहे. अण्णाद्रमुकमध्ये पूर्वी पन्नीरसेल्वम हे समन्वयक तसेच पलानिसामी हे संयुक्त समन्वयक होते. दोन्ही नेत्यांकडून संयुक्तपणे बोलाविण्यात आलेल्या 23 जून रोजीच्या बैठकीत पक्षात एकमेव नेतृत्व व्यवस्था लागू करण्याची मागणी एका गटाने केली होती. पलानिसामी समर्थक असलेल्या या गटाला मोठा पाठिंबा मिळाला होता. याप्रकरणी पन्नीरसेल्वम यांच्या गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.