चुरशीच्या अंतिम लढतीत चीनच्या वेंग यांगवर मात : महिला एकेरीत जपानची अकाने यामागुची विजेती
वृत्तसंस्था/ क्वालालम्पूर
भारताचा स्टार बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयने मलेशिया मास्टर्स बॅडमिंटनचे जेतेपद पटकावत इतिहास रचला. 30 वर्षीय प्रणॉयने रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात चीनच्या वेंग यांगचा 21-19, 13-21, 21-18 असा पराभव करत जेतेपदाला गवसणी घातली. या जेतेपदानंतर भारतीय बॅडमिंटन महासंघाने त्याचे विशेष अभिनंदन केले आहे. याशिवाय, महिला एकेरीत जपानच्या अकाने यामागुचीने अजिंक्यपद पटकावले.
सहा वर्षानंतर प्रथमच जेतेपद
रविवारी मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचा अंतिम सामना अतिशय चुरशीचा झाला. 94 मिनिटे चाललेल्या या रोमांचक सामन्यात जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेला भारताचा स्टार खेळाडू एचएस प्रणॉयला जेतेपदासाठी मात्र घाम गाळावा लागला. प्रणॉयने जागतिक क्रमवारीत 34 व्या स्थानावर असलेल्या चीनच्या वेंग यांगला 21-19, 13-21, 21-18 असे नमवण्याची किमया साधली. विशेष म्हणजे, मलेशियन ओपनमध्ये पुरुष गटात भारताचे हे पहिलेच जेतेपद ठरले आहे. तसेच 2017 मधील अमेरिकन ओपन स्पर्धेतील जेतेपदानंतर प्रथमच सहा वर्षानंतर प्रणॉयने वैयक्तिक जेतेपद मिळवले आहे. केरळच्या या खेळाडूने गतवर्षी स्वीस ओपन बॅडमिंटनची अंतिम फेरी गाठली होती. मात्र, विजेतेपदाने त्याला हुलकावणी दिली होती. याशिवाय, त्याने मलेशिया आणि इंडोनेशिया सुपर 1000 स्पर्धेत देखील सेमी फायनल गाठली होती. यंदाच्या वर्षी मात्र मलेशियन ओपनमध्ये जेतेपद पटकावत त्याने सहा वर्षाचा जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणला आहे.
विजयासाठी संघर्ष
अपेक्षेप्रमाणे या स्पर्धेत शानदार फॉर्ममध्ये असणाऱ्या प्रणॉयने धडाक्यात सुरुवात करताना पहिला गेम 21-19 असा जिंकला. या गेममध्ये त्याने सुरुवात शानदार केली पण प्रतिस्पर्धी वेंगने काही गुण मिळवत त्याला टक्कर दिली. पण शेवटी प्रणॉयने 19-19 अशा बरोबरीनंतर सलग दोन गुणाची कमाई करत हा गेम जिंकत 1-0 अशी आघाडी घेतली. यानंतर मात्र चीनच्या 23 वर्षीय वेंगने जोरदार पुनरागमन करत दुसरा गेम 21-13 असा सहज जिंकला व सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. या गेममध्ये वेंगने शानदार खेळाचे प्रदर्शन साकारताना प्रणॉयला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. या गेममध्ये प्रणॉयकडून चुका झाल्या, त्याचा फायदा वेंगने घेतला.
तिसऱ्या व निर्णायक गेममध्ये मात्र प्रणॉयने जबरदस्त पुनरागमन केले. सुरुवातीला प्रणॉय 6-8 असा पिछाडीवर होता मात्र नेटजवळ त्याने दोन गुणाची कमाई करत त्याने 8-8 अशी बरोबरी साधली. यानंतर त्याने जोरदार स्मॅशेसच्या जोरावर 16-13 अशी आघाडी मिळवली. प्रतिस्पर्धी वेंगने काही गुण मिळवत त्याला टक्कर देण्याचा प्रयत्न केला पण मोक्याच्या क्षणी प्रणॉयने आपला खेळ उंचावत हा गेम 21-18 असा जिंकला व या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.
मलेशियन स्पर्धेचे जेतेपद पटकावणारा तिसरा भारतीय
मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेला 2009 पासून प्रारंभ झाला. ही स्पर्धा सुरु झाल्यापासून केवळ तीनच भारतीयांना जेतेपद मिळवता आले आहे. महिला एकेरीत 2016 मध्ये पीव्ही सिंधूने तर 2017 मध्ये सायना नेहवालने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. या दोघीनंतर ही स्पर्धा जिंकणारा प्रणॉय तिसरा भारतीय ठरला आहे. दरम्यान, या स्पर्धेचे जेतेपद पटकावणारा पुरुष गटातील प्रणॉय पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी कोणत्याही भारतीय पुरुष खेळाडूला या स्पर्धेचे विजेतेपद पटकावता आले नव्हते.
महिला एकेरीत जपानची अकाने यामागुची अजिंक्य
रविवारी महिलांच्या अंतिम सामन्यात अपेक्षेप्रमाणे जपानच्या यामागुचीने वर्चस्व राखले. तिने अंतिम सामन्यात इंडोनेशियाच्या ग्रिगोरियाचा 21-17, 21-7 असा धुव्वा उडवला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात यामागुचीने सुरुवातीपासून वर्चस्व राखताना इंडोनेशियाच्या ग्रिगोरियाला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही.
तब्बल सहा वर्षानंतर मिळालेल्या जेतेपदाचा आनंद खास आहे. गतवर्षी, स्वीस ओपनमध्ये जेतेपदाने हुलकावणी दिली होती. यंदा मात्र मलेशियन ओपनमध्ये शानदार कामगिरी केल्यामुळे जेतेपदापर्यंत पोहोचता आले.
-एचएस प्रणॉय, भारतीय बॅडमिंटनपटू