अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशाच्या मध्यमवर्गीयांमध्ये माझाही समावेश आहे. मध्यमवर्गीयांवरील आर्थिक दडपण मी जाणून आहे, असे प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी एका कार्यक्रमात केले आहे. सीतारामन या 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार असून यात सर्वसामान्य जनतेपासून विविध राज्ये आणि वित्तीय संस्थांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील.
2023-24 च्या अर्थसंकल्पाची सर्व तयारी जवळपास अंतिम टप्प्यात आहे. कराचा भार झेलणाऱया मध्यमवर्गाला काही प्रमाणात दिलासा देण्याचे आव्हान अर्थमंत्र्यांसमोर असणार आहे. मध्यमवर्गावरील आर्थिक दडपणाची मला जाणीव आहे. केंद्रातील मोदी सरकारने मध्यमवर्गावर कुठल्याही प्रकारचा नवा कर लादलेला नसल्याचे सीतारामन यांनी म्हटले आहे.
अर्थमंत्र्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे साप्ताहिक पांचजन्यकडून आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित केले आहे. मी देखील मध्यमवर्गाशी संबंधित असल्याने त्यांच्यावरील दबाव ओळखून आहे. स्वतःला मध्यमवर्गातील कुटुंबाच्या सदस्याच्या स्वरुपात मानते. मोदी सरकारने मध्यमवर्गाचा विचार करत 5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केल्याचे अर्थमंत्री म्हणाल्या. देशातील करांचा एक अत्यंत मोठा भार मध्यमवर्गीयांवर आहे, कारण बहुतांश वेतनधारक मध्यमवर्गातील असल्याचे मानले जाते. अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी मध्यमवर्गाला करात सूट किंवा अन्य पद्धतींनी दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.