ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुंबईला पुन्हा एकदा बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञाताने ट्विटद्वारे मुंबई पोलिसांना ही धमकी दिली. “मी लवकरच मुंबईला बॉम्बने उडवणार”, असा मेसेज सोमवारी सकाळी 11 वाजता या व्यक्तीने ट्विटरवर पोस्ट केला होता. त्यानंतर मुंबई पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
मुंबई पोलिसांनी आज या प्रकरणाची माहिती मीडियाला दिली. धमकी मिळाल्यानंतर काही वेळातच सायबर क्राईमच्या मदतीने संबंधिताची ओळख पटवून त्याला अटक करण्यात आली. सध्या त्याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, सोमवारीच मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला एका अज्ञात व्यक्तीने फोन केला होता. मला 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात माहिती देणारे फोन येत असल्याचे त्याने पोलिसांना सांगून फोन कट केला. त्यानंतर मुंबई पोलीस अलर्टवर असून यासंदर्भातही तपास सुरू आहे.