इचलकरंजी प्रतिनिधी
कापड व सूत खरेदी-विक्री व्यवसायाचा मुल्यवर्धित कर न भरता शासनाची 94 लाख 8 हजार 536 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रविण पुष्पक अग्रवाल (रा. कागवाडे मळा) याच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य कर सहआयुक्त प्रशासन (कोल्हापूर विभाग) सुनिता थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कर उपायुक्त डॉ. अश्विनी ठाणेकर यांच्या पथकाने केली.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, प्रविण अग्रवाल याचा कापड, सूत, सूतधागा खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. मे. कांचन विव्हिंग मिल्स या नांवे असलेल्या फर्मद्वारे तो व्यवहार करत होता. त्याचा व्हॅट नं. 27270271642व्हीसी असा आहे. सन 2009-10 आणि सन 2010-11 या कालावधीत प्रविण अग्रवाल याने 94 लाख 8 हजार 536 रुपयांचा कर भरलाच नाही. या थकबाकी संदर्भात प्रविण अग्रवाल याला वेळोवेळी सूचना तसेच नोटीसाही बजावण्यात आल्या. परंतु अग्रवाल याच्याकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायदा कलम 2002 चे कलम 74(02) प्रमाणे कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी शुक्रवारी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी राज्य कर निरिक्षक युवराज कृष्णात पाटील (रा. आसुर्ले) यांनी फिर्याद दिली आहे. या कारवाईवेळी राज्य कर निरिक्षक प्रविण जंगटे उपस्थित होते.