लंकेविरुद्ध दुसरा टी-20 सामना आज, धावांची बरसात होण्याची अपेक्षा
वृत्तसंस्था/ पुणे
भारत व लंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना गहुंजेतील एमसीए स्टेडियमवर आज होणार असून रोमांचक ठरलेला पहिला सामना जिंकून भारताने मालिकेत आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्याचा भारताचा इरादा असेल तर मालिकेतील आव्हान जिवंत राखण्यासाठी लंकेला हा सामना जिंकून बरोबरी साधावी लागणार आहे. सायंकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होणार असून स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर त्याचे प्रक्षेपण होणार आहे.
सलामीवीर शुबमन गिल व शिवम मावी या दोघांना पहिल्या सामन्यात टी-20 पदार्पणाची संधी मिळाली. यापैकी शिवम मावीने संधीचे सोने करीत शानदार गोलंदाजी करून विजयात मोलाचा वाटा उचलला. मात्र शुबमन गिलला या संधीचा उपयोग करून घेता आला नाही. तो केवळ 7 धावा काढून बाद झाला. भारताचा पॉवरप्लेमधील फलंदाजी सुधारण्यावर भर असल्याने गिल पॉवरप्लेमध्ये कसा खेळतो, याकडे व्यवस्थापनाचे लक्ष लागले आहे. या जागेचा दुसरा दावेदार रुतुराज गायकवाड प्रतीक्षेत असून त्याला दूर ठेवायचे असल्यास गिलला या सामन्यात चमक दाखविणे अत्यावश्यक असेल.
पहिला सामना केवळ दोन धावांनी भारताने जिंकताना माफक धावांचे रक्षण करण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला होता. पण अशा सामन्यातून युवा खेळाडूंना कठीण परिस्थितीवर मात करण्याचा अनुभव मिळतो, जो भविष्यात उपयुक्त ठरणारा असतो, असे कर्णधार हार्दिक पंडय़ाने सामन्यानंतर म्हटले होते. वनडे विश्वचषकाचे वर्ष असल्याने टी-20 क्रिकेटला जास्त प्राधान्य देण्यात येणार नसल्याने गिलला त्याच्या आधीच्या खेळाडूंनी संघातील स्थान भक्कम करण्यासाठी केलेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळावी लागेल. गिलने आयपीएल व सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत मिळून 96 टी-20 सामन्यांत 128.74 या माफक स्ट्राईकरेटने धावा जमविल्या आहेत. मालिकेतील पहिल्या सामन्यातही त्याने अडखळत सुरुवात केली होती. गिलने आयपीएलमध्ये केकेआरसाठी व गुजरात टायटन्ससाठीही त्याने आघाडीला खेळले आहे. प्रथम स्थिरावणे व नंतर आक्रमण करणे ही त्याची खेळण्याची पद्धत आहे. पण अशाच खेळण्यामुळे केएल राहुलला संघातील स्थान गमवावे लागले आहे. कर्णधार हार्दिकने निर्भय ऍप्रोच ठेवण्याचे आश्वासन दिले असले तरी ते खरे करून दाखविण्याची जबाबदारी प्रत्येक खेळाडूची आहे. भारताकडे गायकवाड, राहुल त्रिपाठी यासारखे प्रतिभावंत टी-20 खेळाडू आहेत. पण सध्या त्यांना बेंचवर बसावे लागत आहे.
गिल व इशान किशन यांना तीनही सामन्यात सलामीला खेळविले जाईल, अशी अपेक्षा आहे. पॉवरप्लेमध्ये अपेक्षित कामगिरी झाल्यास नंतर येणाऱया फलंदाजांना फियरलेस क्रिकेट खेळण्याचा आत्मविश्वास येईल. भारताच्या फलंदाजी युनिटला या सामन्यात भरपूर धावा जमवायच्या आहेत. पण उपकर्णधार सूर्यकुमार यादव पहिल्या दहा षटकांत कशा प्रकारे ‘हेवि डय़ुटी बॅटिंग’ करतो, त्यावर हे अवलंबून असेल. मागील वर्ष गाजविणारा सूर्या पहिल्या सामन्यात स्कूप करताना स्वस्तात बाद झाला. पण खेळपट्टीत कमी वेग असल्याने त्याचा स्कूप फसला होता. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसारख्या ठिकाणी त्याचा हा फटका षटकारासाठी गेला असता. पण स्मार्ट सूर्या त्यावर नक्कीच तोडगा काढेल आणि या सामन्यात त्या दुर्मीळ अपयशाची भरपाई करेल, अशी अपेक्षा आहे.
दीपक हुडा व अक्षर पटेल यांनी केलेल्या फलंदाजीची सर्वांनीच तारीफ केली. फलंदाजी व गोलंदाजीत त्यांच्याकडून पुन्हा अशाच उपयुक्त कामगिरीची अपेक्षा आहे. शिवम मावीच्या स्वप्नवत पदार्पणाने हार्दिक बराच सुखावला आहे. हार्दिकने स्वतः गोलंदाजीची सुरुवात नवोदित गोलंदाजासमवेत करून प्रारंभापासूनच लंकेवर दडपण निर्माण केल्याने त्याचे कौतुक करण्यात आले. मावीची स्विंग करण्याची क्षमता आणि उमरानचा वेग ही या संघाची जमेची बाजू ठरली असून 2024 वर्ल्ड कपसाठी त्यांच्यावर लक्ष असेल.
स्पिनर यजुवेंद्र चहलला टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी डावलण्यात आले होते. यामुळे त्याच्या आत्मविश्वासावर परिणाम झाला असल्याने त्याच्याकडून अपेक्षित कामगिरी होताना दिसत नाही. पहिल्या सामन्यात दोनच षटकात त्याने 26 धावा दिल्यानंतर हार्दिकने त्याचा कोटाही पूर्ण केला नाही.
लंकन संघाकडून पुन्हा एकदा कडव्या प्रतिकाराची अपेक्षा असून आशिया चषक विजेता संघ हा सामना जिंकून बरोबरी साधण्यासाठी निश्चितच प्रयत्न करेल. फलंदाजी व गोलंदाजीत स्पिनर्सवर त्यांची जास्त भिस्त आहे. लंकन संघ स्पिनर्स वनिंदू हसरंगा व महीश तीक्षणा यांच्यावर जास्त अवलंबून असून या दोघांनी 8 षटकांत 51 धावा दिल्या होत्या.
mebYeeJकe mebIe ë Yeejle ः हार्दिक पंडय़ा (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन, गायकवाड, गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, सॅमसन, सुंदर, चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.
uebkeढe ः दसुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, समरविक्रमा, कुसल मेंडिस, भानुका राजपक्षे, असालंका, धनंजय डिसिल्वा, हसरंगा, अशेन बंदारा, महीश तीक्षणा, जेफ्री व्हान्डरसे, चमिक करुणारत्ने, दिलशान मधुशन्का, कसुन रजिता, नुवानिंदू फर्नांडो, वेलालगे, प्रमोद मधुशान, लाहिरु कुमारा, नुवान तुषारा.
meecevकeeऍeer JesU ः सायंकाळी 7 पासून
Lesì Heख#esHeCe ः स्टार स्पोर्ट्स नेटवर्क.