यजमान भारतीय संघासमोर मालिकेतील अस्तित्व कायम राखण्याचे आव्हान
दीपक चहर दुखापतीमुळे बाहेर, व्यवस्थापनासमोर निवडीचा पेच
रांची / वृत्तसंस्था
भारतीय संघ आज (दि. 9) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱया वनडे सामन्यासाठी आमनेसामने भिडेल, त्यावेळी प्रामुख्याने मालिकेतील अस्तित्व कायम राखण्याचे आव्हान असेल. दक्षिण आफ्रिकेने पहिली वनडे जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली असून यामुळे भारताला आज सर्व आघाडय़ांवर दक्ष रहावे लागेल. आजची लढत दुपारी 1.30 पासून खेळवली जाणार असून त्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरुन केले जाईल.
मुळात, टी-20 वर्ल्डकप स्पर्धा अवघ्या 8 दिवसांवर येऊन ठेपली असताना द्विदेशीय वनडे मालिका आयोजित करण्याचे प्रयोजन अनाकलनीय आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताचा अव्वल संघ ऑस्ट्रेलियातील टी-20 वर्ल्डकपसाठी एव्हाना पर्थमध्ये दाखल झाला आहे. मात्र, इकडे धवनच्या नेतृत्वाखालील दुसऱया फळीतील खेळाडूंचा भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या वनडे मालिकेत खेळत आहे.
दीपक चहर लखनौमधील पहिल्या वनडेत दुखापतग्रस्त झाला असून मोहम्मद सिराज व अवेश खान आतापर्यंत अजिबात प्रभाव पाडू शकलेले नाहीत. बंगालचा उदयोन्मुख गोलंदाज मुकेश कुमारसाठी यामुळे संघाचे दरवाजे उघडू शकतात.
फलंदाजीच्या आघाडीवर, श्रेयस अय्यरला सूर सापडणे आवश्यक आहे. श्रेयसचा टी-20 वर्ल्डकपसाठी राखीव खेळाडूत समावेश असून यामुळे तो बहरात असणे आवश्यक असेल. या मालिकेत उपकर्णधारपदी कार्यरत या अव्वल फलंदाजाने पहिल्या लढतीत सहकारी फलंदाज स्वस्तात बाद होत असताना किल्ला लढवला होता. उसळत्या गोलंदाजीला सामोरे जाण्यातील दुबळेपणा व पेसर्सविरुद्ध संथगती स्ट्राईक रेटसाठी ओळखल्या जाणाऱया श्रेयसने त्यावेळी दमदार काऊंटर ऍटॅक साकारला.
संजू सॅमसनच्या फटकेबाजीमुळे भारताला दिलासा
यापूर्वी, पहिल्या वनडेत भारताला निसटता पराभव पत्करावा लागला, त्यावेळी संजू सॅमसनने 63 चेंडूत 86 धावांची तडफदार खेळी साकारली आणि यामुळे संघाला दिलासा लाभला. शिखर धवनने विंडीज व लंकेविरुद्ध दुय्यम दर्जाचा संघ हाताशी असताना मालिकाविजय संपादन करुन दिले असून येथेही त्याच्याकडून हीच अपेक्षा असेल.
धवनने स्वतः बहरात परतणे आवश्यक असून शुभमन गिलला देखील वनडे सलामीवीर या नात्याने आपले स्थान भक्कम करण्यासाठी निर्धाराने खेळणे भाग असेल.
संभाव्य संघ
भारत ः शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, अवेश खान, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, रजत पाटीदार, शाहबाज अहमद, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर.
दक्षिण आफ्रिका ः तेम्बा बवूमा (कर्णधार), जानेमन मलान, क्विन्टॉन डी कॉक, एडन मॅरक्रम, हेन्रिच क्लासेन, डेव्हिड मिलर, वेन पर्नेल, केशव महाराज, कॅगिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, तबरेझ शमसी, रिझा हेन्ड्रिक्स, मार्को जान्सन, ऍनरिच नोर्त्झे, अँदिले फेहलुकवायो.
सामन्याची वेळ ः दुपारी 1.30 वा.
दक्षिण आफ्रिकन संघासमोर अनेक आव्हाने
मालिकेत पहिला सामना सहज जिंकला असला तरी तेम्बा बवूमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकन संघासमोर बरीच आव्हाने आहेत. स्वतः बवूमा या दौऱयात अतिशय खराब फॉर्ममध्ये असून टी-20 मालिकेत अनुक्रमे 0, 0, 3 धावांवर बाद व्हावे लागल्यानंतर लखनौमधील पहिल्या वनडेत देखील तो केवळ 8 धावांवरच तंबूत परतला आहे. टी-20 स्पर्धा अवघ्या दोन-एक आठवडय़ांच्या अंतरावर असताना त्याचा हा खराब फॉर्म आफ्रिकन संघव्यवस्थापनासाठी चिंतेचा असणे साहजिक आहे.
डेव्हिड मिलर या मालिकेतही भारतीय संघाचा कर्दनकाळ ठरत आला असून गुवाहाटीत नाबाद शतक झळकावल्यानंतर त्याने मागील सामन्यात नाबाद 75 धावा फटकावत आपला फॉर्म कायम राखला. कॅगिसो रबाडाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा जलद गोलंदाजी ताफा पुन्हा एकदा भारतीय फलंदाजी लाईनअपला खिंडार पाडण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.
उर्वरित वनडेसाठी दीपक चहरऐवजी वॉशिंग्टन सुंदरला संधी
भारताच्या राष्ट्रीय निवड समितीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उर्वरित 2 वनडे सामन्यांसाठी दुखापतग्रस्त दीपक चहरऐवजी वॉशिंग्टन सुंदरचा समावेश केला आहे. दीपक चहरला यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंदोर येथे खेळवल्या गेलेल्या तिसऱया व शेवटच्या टी-20 सामन्यात पाठदुखी जाणवली होती आणि त्यानंतर लखनौत पहिल्या वनडेत तो अंतिम एकादशमध्ये समाविष्ट नव्हता.
30 वर्षीय दीपक चहर आता राष्ट्रीय अकादमीत परतणार असून तेथे बीसीसीआय वैद्यकीय पथक त्याच्यावर उपचार करेल. चहरने आजवर 9 वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले असून यात 15 बळी घेतले आहेत. 27 धावात 3 बळी, ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.