वृत्तसंस्था/ बर्मिंगहम
येथे सुरू असलेल्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या हॉकी या क्रीडा प्रकारात भारतीय महिला हॉकी संघाने आपला सलग दुसरा विजय नोंदविला. अ गटातील झालेल्या सामन्यात भारताने वेल्सचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला.
या सामन्यात भारताने आपले तिन्ही गोल पेनल्टी कॉर्नर्रवर नोंदविले. शनिवारच्या या सामन्यात भारतीय संघातील वंदना कटारियाने दोन गोल तर गुरुजित कौरने एक गोल केला. या सामन्यात सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत भारतीय महिला हॉकीपटूंनी सांघिक कामगिरीवर अधिक भर देत नियंत्रण राखले होते. या सामन्यात भारताने आपले तीन गोल पेनल्टी कॉर्नरवर नोंदविले असले तरी त्यांनी या सामन्यात आणखी काही पेनल्टी कॉर्नर्स गमविले. भारतीय संघाला पेनल्टी कॉर्नरवर अचूक गोल करण्यासाठी अधिक सराव करावा लागेल. वेल्सतर्फे एकमेव गोल झिना हय़ुजेसने नोंदविला. या संपूर्ण लढतीमध्ये भारताला एकूण सात पेनल्टी कॉर्नर मिळाले आणि त्यापैकी चार वाया गेले. वेल्सला मात्र या सामन्यात एकमेव पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि त्याचा लाभ हय़ुजेसने घेतला. वेल्सची गोलरक्षक थॉमसची कामगिरी दर्जेदार झाली. या लढतीतील दुसऱया मिनिटालाच भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण वेल्सची गोलरक्षक थॉमसने हा कॉर्नर थोपविला. 13 व्या मिनिटाला भारताच्या लालरेमसियामीचा फटका गोलरक्षक थॉमसने अडविल्याने भारताला खाते उघडता आले नाही. 26 व्या मिनिटाला भारताचे खाते वंदना कटारियाने पेनल्टी कॉर्नरवर उघडले. 28 व्या मिनिटाला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि गुरुजित कौरने गोलरक्षक थॉमसला हुलकावणी देत उजव्या बगलेतून भारताचा दुसरा गोल नोंदविला. मध्यंतराला एक मिनिट बाकी असताना भारताला आणखी पेनल्टी कॉर्नर मिळाला पण दीप ग्रेस एक्काचा हा फटका थॉमसने थोपविला. मध्यंतरापर्यंत भारताने वेल्सवर 2-0 अशी आघाडी घेतली.
44 व्या मिनिटाला भारताचा तिसरा गोल वंदना कटारियाने पेनल्टी कॉर्नरवर नोंदविला. सामन्यातील तिसऱया 15 मिनिटांच्या कालावधीतील 13 सेकंद बाकी असताना वेल्सला एकमेव पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि झिना हय़ुजेसने हा गोल नोंदवून भारताची आघाडी थोडी कमी केली. 47 व्या मिनिटाला भारताला सहावा पेनल्टी कॉर्नर मिळाला पण गुरुजित कौरचा फटका गोलरक्षक थॉमसने थोपविला. 48 व्या मिनिटाला भारताला या सामन्यातील शेवटचा पेनल्टी कॉर्नर मिळाला पण त्याचे गोलात रुपांतर होऊ शकले नाही. अखेर भारताने हा सामना 3-1 अशा गोलफरकाने जिंकून या स्पर्धेत आपला सलग दुसरा विजय नोंदविला. भारताचा आता पुढील सामना यजमान इंग्लंडबरोबर 2 ऑगस्ट रोजी खेळविला जाणार आहे.